मुंबई,
Will you get ₹1,500 or ₹3,000? राज्यातील लाखो महिलांच्या नजरा सध्या लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याकडे लागल्या आहेत. जून महिना सुरू होऊन पहिला आठवडा संपत आला असतानाही मे महिन्याचा लाभ अद्याप खात्यात जमा झालेला नसल्याने लाभार्थींमध्ये उत्सुकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत लाभार्थी महिलांना पुढील आर्थिक मदत कधी आणि कशा पद्धतीने द्यायची यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मे महिन्याचा प्रलंबित हप्ता स्वतंत्रपणे वितरित केला जाणार की मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे लाभ एकत्र जमा केले जाणार, याबाबतही आज स्पष्टता येऊ शकते.

यासोबतच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबतही सरकार विचार करू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पात्र लाभार्थ्यांची पडताळणी आणि निधी वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने काही नवीन निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.राज्यातील सुमारे एक कोटी ६६ लाख महिला या योजनेचा लाभ घेत असून त्यांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील आचारसंहिता संपल्यानंतर निधी वितरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जून महिन्याच्या उत्तरार्धात लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्यभरातील लाभार्थी महिलांचे लक्ष लागले असून हप्त्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.