तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
pcod-clinic-facility : जिल्ह्यातील महिलांचे आरोग्य सुदृढ राखण्याच्या उद्देशाने तसेच विशेषतः अविवाहित तरुणी आणि प्रजननक्षम वयोगटातील महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) या संप्रेरकांशी संबंधित आजाराच्या निदान व उपचारासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय, यवतमाळ येथे पीसीओडी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.
पीसीओडीमुळे महिलांमध्ये शारीरिक, मानसिक तसेच हार्मोनल बदल घडून येतात. या समस्यांवर योग्य वेळी वैद्यकीय उपचार, तपासणी आणि समुपदेशन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यभरात पीसीओडी क्लिनिक सुरू करण्यात आले असून यवतमाळ जिल्ह्यातही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्यांचा शुभारंभ करण्यात आला आहे.
हे क्लिनिक दर महिन्याच्या दुसèया आणि चौथ्या बुधवारी, म्हणजे दर पंधरा दिवसांनी कार्यरत राहणार आहे. लाभार्थींना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी स्त्रीरोग तज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनात तपासणी, आवश्यक वैद्यकीय चाचण्या, एकात्मिक औषधोपचार, आरोग्यविषयक समुपदेशन तसेच आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या पीसीओडी क्लिनिक शुभारंभ कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य परिचारिका कांचन गादे यांनी जिल्हा माता व बाल रुग्णालयातील पीसीओडी क्लिनिकबाबत सविस्तर माहिती देत आरोग्यविषयक समुपदेशन केले. तसेच पीसीओडीग्रस्त महिलांनी घ्यावयाची काळजी, योग्य आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा माता व बाल रुग्णालयातील वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनीता वानोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी (बालसंवर्धन) डॉ. रमेश मांडण उपस्थित होते. त्यांनी पीसीओडीमुळे होणाèया शारीरिक, मानसिक व संप्रेरकांतील बदलांवर वेळेवर उपचार आणि समुपदेशनाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्ह्यातील अविवाहित तरुणी व महिलांनी या विशेष आरोग्यसेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी केले आहे.