भारतीय खलाशाच्या मृत्यूचे अवयव गायब!

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Indian sailor's Organs missing व्हेनेझुएलामध्ये मृत्यू झालेल्या एका भारतीय खलाशाच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. परदेशातून भारतात आणण्यात आलेल्या मृतदेहाची पुन्हा तपासणी केल्यानंतर अनेक महत्त्वाचे अवयव गायब असल्याचा धक्कादायक दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे मृत्यूचे खरे कारण अद्याप अस्पष्ट असून संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.मृत व्यक्तीची ओळख उत्तर प्रदेशातील देवरिया येथील ३३ वर्षीय राकेश चौहान अशी आहे. ते मालवाहू जहाजावर कामासाठी गेल्या वर्षी व्हेनेझुएलाला गेले होते. मे महिन्यात त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना देण्यात आली. सुरुवातीला कंपनीकडून जहाजावर अपघात झाल्याचे सांगण्यात आले, तर नंतर प्रकृती गंभीर असल्याचे कळवण्यात आले. काही तासांतच त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचली.
 
 
व्हेनेझुएला
 
राकेश यांचा मृतदेह भारतात आल्यानंतर कुटुंबीयांना अनेक बाबी संशयास्पद वाटल्या. मृतदेहावर मोठ्या प्रमाणात टाके असल्याचे दिसून आले. यानंतर कुटुंबीयांनी पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या तपासणीत मेंदू, हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंडांसह अनेक अंतर्गत अवयव शरीरात नसल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला.या धक्कादायक खुलाशामुळे कुटुंबीय संतप्त झाले असून त्यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शरीरातील महत्त्वाचे अवयव नसल्यामुळे वैद्यकीय तपासणीदरम्यानही मृत्यूमागील कारण निश्चित करण्यात अडचणी निर्माण झाल्या.
 
 
दरम्यान, खलाशी संघटनांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित कंपनी, परदेशातील अधिकारी आणि मृत्यूशी संबंधित सर्व घटनाक्रमाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच भारतीय दूतावासाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशीही मागणी जोर धरत आहे. राकेश चौहान यांच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाईसह योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली असून या रहस्यमय मृत्यूमागील सत्य काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.