मुंबई
abhishek bachchan अभिनेता अभिषेक बच्चनने नुकतेच बॉलिवूडमधील आपल्या कारकिर्दीची 26 वर्षे पूर्ण केली आहेत. 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. या निमित्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणे भाष्य केले. अभिनेता म्हणून वर्षानुवर्षे त्याचा आत्मविश्वास कसा वाढत गेला आणि स्वतःमध्ये कोणते बदल झाले, याबद्दल त्याने सविस्तर सांगितले.
“फक्त एकच बदल झाला आहे की आता मला अधिक सहज आणि आत्मविश्वास वाटतो. मला वाटतं की मी जेव्हा सुरुवात केली, तेव्हा मी थोडा अस्वस्थ होतो. पण आता मी कॅमेरासमोर अधिक सहजपणे वावरतो. जेव्हा तुम्ही जसे आहात तसे वागता आणि स्वत:मध्ये सहजपणा आणता, तेव्हा तुम्हाला घ्यायच्या निर्णयांबद्दल अधिक स्पष्टता येते. आज मी खूप स्पष्ट आहे किंवा असं म्हणायला हवं की गेल्या पाच ते सात वर्षांत काय करायचं नाही हे ठरवण्याच्या बाबतीत मी आता अधिक स्पष्ट झालोय. करिअरच्या सुरुवातीला काम मिळेल की नाही याबद्दल खूप अनिश्चितता असते. त्यामुळे तुमच्याकडे जे काही काम येतं, ते तुम्ही स्वीकारता.”
26 वर्षांच्या अभिनय abhishek bachchan कारकिर्दीत अभिषेकने ‘गुरू’, ‘धूम’ आणि ‘बंटी और बबली’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘ब्लफमास्टर’, ‘युवा’, ‘द बिग बुल’, ‘बॉब बिस्वास’, ‘टेन्थ’, ‘घुमर’, ‘आय वाँट टू टॉक’ आणि ‘बी हॅपी’ या चित्रपटांतील त्याच्या प्रभावी अभिनयाचेही विशेष कौतुक झाले आहे.
मात्र, या प्रवासात अभिषेकला त्याच्या कारकिर्दीवरून अनेकदा ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे. अमिताभ बच्चन यांचा मुलगा असूनही त्यांनी इंडस्ट्रीत तेवढ्या प्रभावीपणे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात अपेक्षित यश मिळवले नसल्याची टीका अनेकांकडून केली जाते. दरम्यान, एका पॉडकास्ट मुलाखतीत अभिषेकची बहीण श्वेता बच्चन हिने भावावरील ट्रोलिंगबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “माझं रक्त खवळतं,” अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया देत अभिषेकची अमिताभ बच्चन यांच्याशी सातत्याने तुलना केली जाणे आपल्याला अजिबात मान्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.