मुंबई/पुणे
balbharti महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून नव्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पाठ्यपुस्तके टप्प्याटप्प्याने लागू करण्यास सुरुवात केली असताना, चौथीच्या गणिताच्या पुस्तकातील काही त्रुटींवर शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
इयत्ता चौथीच्या गणिताच्या मराठी व इंग्रजी माध्यमातील पाठ्यपुस्तकांमध्ये प्रख्यात भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकीची नमूद करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. पुस्तकात रामानुजन यांची निधनतारीख 27 एप्रिल 1920 अशी छापण्यात आली असून, प्रत्यक्षात ती 26 एप्रिल 1920 असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या चुकीमुळे शिक्षण क्षेत्रात गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
याशिवाय मराठी माध्यमातील गणिताच्या पुस्तकात पान क्रमांक 55 वर ‘1000 ग्रॅमपेक्षा जास्त’ असे चुकीचे उल्लेखन करण्यात आले असून प्रत्यक्षात ते ‘1000 किलोग्रॅमपेक्षा जास्त’ असे असणे अपेक्षित होते. तसेच इंग्रजी माध्यमातील पुस्तकात पान क्रमांक 77 वरही दोन ठिकाणी छपाईच्या चुका आढळून आल्या आहेत.या त्रुटींवर प्रतिक्रिया देताना बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, या चुका लक्षात आल्या असून पुढील आवृत्तीत त्या दुरुस्त केल्या जातील. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सुधारित माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या QR कोडच्या माध्यमातून व्हिडिओ स्वरूपात दुरुस्त माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मीडिया अहवालांनंतर या त्रुटी समोर आल्यानंतर बालभारतीने संबंधित चुका मान्य करत पुढील आवृत्तीत त्या दुरुस्त करण्यात येतील, तसेच तात्पुरत्या स्वरूपात QR कोडद्वारे विद्यार्थ्यांना योग्य माहिती देण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.या प्रकारामुळे नवीन अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांच्या गुणवत्ता नियंत्रणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिक्षक वर्गात नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.