भंडारा
farmers protest बीटीपी भाजी मंडीतील पाच व्यापाऱ्यांच्या दुकानांना नगर पालिकेने सील लावून दुकाने बंद केली. व्यापार बंद झाल्याने या व्यापाऱ्यांकडे भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण झाली. दोन दिवसांपासून हजारो क्विंटल भाजीपाला पडून राहत असल्याने अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज नगर परिषदेत जाऊन रोष व्यक्त केला. सोबत आणलेली शेकडो किलो वांगी आणि अन्य भाजीपाला मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षा पुढे फेकून माल खरेदी करा किंवा मंडीतील दुकाने सुरू करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
मालाचे पैसे द्या, अन्यथा विकून द्या!
बीटीबी सब्जी मंडी परिसरात वेगवेगळे व्यापारी रोज जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाल्याची खरेदी करतात. या मंडीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना नवा मार्ग गवसला आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी नगर परिषदेने मंडीतील पाच दुकानांना बाजार चिठ्ठीचा कर न भरल्याच्या कारणावरून सील ठोकली. यात बंडू बारापात्रे, अतुल मानकर, मंगेश राऊत, किरण भेदे आणि दिपक पराते यांच्या दुकानाचा समावेश आहे. नगरपरिषदेने केलेली कारवाई चुकीची आणि हेतू पुरस्सर केल्याचा आरोप या व्यापाऱ्यांनी केला आहे. नगरपरिषदेच्या नियमाप्रमाणे 300 चौरस फुटासाठी 100 रुपये प्रति गाळा कर आकारणी अपेक्षित असताना, येणाऱ्या प्रत्येक पोत्यावर 5 रुपया प्रमाणे कर आकारण्याचा प्रकार अन्यायकारक असून या संदर्भात न्यायालयात लढाई सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही कारवाई सूडातून करण्यात आल्याचे व्यापारी सांगतात.
व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याने जिल्हाभरातून येणारे शेतकरी आता अडचणीत आले आहेत. जे व्यापारी रोज करांचा माल खरेदी करायचे दोन दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांचा आलेला भाजीपाला माल पडून आहे. मालाची विक्री होत नसल्याने प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. अखेर आज संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी सोबत आणलेल्या भाजीपाल्यासह थेट नगरपरिषद गाठले. त्यांच्याजवळ असलेला शेकडो किलो भाजीपाला थेट नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षा समोर टाकून संताप व्यक्त केला. वांगी आणि इतर भाजीपाल्याचा सडा पालिकेत पडून होता. दरम्यान आमच्या मालाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने मदत करावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी लावून धरली. 20 ते 30 एवढ्या संख्येत आलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला टाकण्याचा केलेला प्रकार सगळ्यांसाठीच आश्चर्याचा होता. हा प्रकार होताच पोलिसांनी येत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान यासंदर्भात शेतकरी आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. एकतर दुकाने सुरू करावी, नाहीतर आमचा भाजीपाला खरेदी करून त्याचे पैसे आम्हाला द्यावे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती.
आमचा भाजीपाला विकून द्या : कडव
आम्ही रोज बंडू बारापात्रे यांच्याकडे शेतात उत्पादित केलेला भाजीपाला विकत होतो. दिवसांपासून दुकान बंद असल्याने भाजीपाला खराब झाला आहे. त्याची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न आहे. परस्पर छोट्या व्यावसायिकांना विकणेही आम्हाला शक्य नाही. अशावेळी नगर परिषदेने तोडगा काढून द्यावा, अशी प्रतिक्रिया येथील शेतकरी पवन कडव यांनी दिली.