दौसा,
Bus fire on Delhi-Mumbai Expressway राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात घडला. ऋषिकेशहून इंदूरकडे निघालेल्या एका स्लीपर बसने कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनवाडाजवळ झिरो पॉईंट परिसरात एका ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि काही क्षणांतच बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून २९ प्रवासी जखमी झाले आहेत.अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. बसमधून मदतीसाठी आरडाओरडा सुरू झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. परिसरात किंकाळ्या आणि आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते.

माहितीनुसार, जखमींमध्ये काही मुलांचाही समावेश असून सर्व २९ जखमींवर दौसा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी ९ जणांची ओळख पटली आहे. प्राथमिक तपासात बस चालकाला झोप लागल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. ही दुर्घटना पहाटे सुमारे ३ वाजता घडली. सहा मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. किरकोळ जखमी झालेल्या काही प्रवाशांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. बसमध्ये ३९ हून अधिक प्रवासी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. ट्रेलरचा चालक आणि वाहकही या अपघातात जखमी झाले आहेत. माहितीनुसार, धडक बसल्यानंतर बसमध्ये अडकलेल्या सहा प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला, तर डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणखी दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि मदत पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.