जामदार हायस्कूलमध्ये प्रवेशोत्सवाचा जल्लोष

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
नागपूर,
jamdar high school जामदार हायस्कूल, रेशीमबाग, नागपूर येथे शैक्षणिक सत्र २०२६–२७ चा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प व बिस्किट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवीतील प्रथम प्रवेशित विद्यार्थ्यांच्या हस्ते वर्गांचे उद्घाटन करून नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. रोहित माडेवार यांनी विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचे महत्त्व पटवून देत शालेय जीवनात संस्कार, शिस्त आणि चारित्र्यनिर्मिती यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव सहकार्य करण्यास तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
 
jamdar high school
 
नवीन शाळा, आधुनिक परिसर आणि सुसज्ज इमारतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेचा परिसर आनंदाने व कुतूहलाने पाहत नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस अविस्मरणीय बनविला. यावर्षी विशेष आकर्षण ठरलेल्या आकर्षक ‘सेल्फी पॉइंट’वर विद्यार्थ्यांनी आपल्या नव्या शाळेतील पहिला सेल्फी काढत प्रवेशोत्सवाचा आनंद साजरा केला. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सर्व शिक्षकांनी संयुक्तपणे परिपाठ सादर करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, संस्कार, मूल्यशिक्षण आणि सामाजिक जाणीवा रुजविण्याचा संदेश दिला.
 
अध्यक्षीय भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. प्राची गांगुलवार यांनी मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, कारण त्या संस्कार, गुणवत्ता आणि मूल्यांचे केंद्र आहेत. जामदार हायस्कूल आज सीबीएसई शाळांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरले असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्याची आम्ही पूर्ण हमी देत आहोत. विद्यार्थी आणि पालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सदैव कटिबद्ध राहील.”
 
प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष दिलीप भराडे आणि संस्थेचे सचिव महेश अंधारे यांचे मार्गदर्शन व सहकार्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लाभले. उत्साह, आनंद आणि नव्या आशांनी भरलेला हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, जामदार हायस्कूलने गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. संचालन व आभार प्रदर्शन उत्सव समिती प्रमुख श्री प्रशांत सावळापूरकर यांनी केले.
सौजन्य: अमोल कानडे, संपर्क मित्र