गॅस सिलेंडर स्वस्त! आजपासून नवे दर लागू

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Cheaper gas cylinders महागाईच्या पार्श्वभूमीवर एलपीजी ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. तेल कंपन्यांनी ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी (FTL) म्हणजेच ‘छोटू’ गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून या सिलेंडरच्या किमतीत १३ रुपयांची घट लागू झाली असून त्यामुळे लहान कुटुंबे, विद्यार्थी, भाड्याने राहणारे आणि छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये ५ किलोचा छोटू सिलेंडर आता ८०८.५० रुपयांना मिळणार आहे. फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडर हे बाजारभावानुसार विकले जातात आणि त्यावर कोणतेही सरकारी अनुदान दिले जात नाही. त्यामुळे बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम त्यांच्या किमतीवर होतो.
 
 
लपीजी
 
हा छोटा सिलेंडर विशेषतः लहान कुटुंबे, पीजी किंवा होस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी, छोटी दुकाने आणि रस्त्यावरील विक्रेते यांच्यात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. त्यामुळे दरकपातीचा थेट फायदा या घटकांना होणार आहे.शहरनिहाय नवीन दर जाहीर करण्यात आले असून दिल्लीमध्ये ८०८.५० रुपये, मुंबईमध्ये ७८० रुपये, कोलकातामध्ये ८४० रुपये, चेन्नईमध्ये ८२५ रुपये, पाटण्यात ८९० रुपये, लखनौमध्ये ८५० रुपये, जयपूरमध्ये ८३५ रुपये, भोपाळमध्ये ८२० रुपये, हैदराबादमध्ये ८६० रुपये आणि बंगळुरूमध्ये ८४५ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.
 
दरकपातीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडच्या काळात जागतिक बाजारात एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घट झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून तेल कंपन्यांनी छोट्या सिलेंडरचे दर कमी केले आहेत.दरम्यान, १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही १८३.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे.