नागपूर,
pratapnagar school प्रतापनगर शिक्षण संस्थेद्वारा संचालित प्रतापनगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात तब्बल दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर ३० जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजताच विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहू लागला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून तसेच गुलाबपुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. या निमित्ताने प्रतापनगर, दक्षिण मध्य रेल्वे कॉलनी परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर घोषणा देत परिसर दणाणून टाकला.
प्रवेशोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमात प्रतापनगर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख, सचिव अनुपमा नाफडे, सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुनील गावपांडे, प्राचार्या सुनंदा गौरकर, मुख्याध्यापक श्रावण सुरकर तसेच पालक प्रतिनिधी राहुल हुमणे यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके, पेन्सिल व अल्पोपहार देण्यात आला, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच क्रीडा, कला व सांस्कृतिक क्षेत्रातही शाळा विशेष भर देत असल्याचे सांगितले. यामुळे विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले नाव लौकिक करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला जि.प. शिक्षण विभागाच्या वंदना बहादुरे व आरती वासाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा सुखदेवे यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
सौजन्य: विजय दाणी, संपर्क मित्र