पुणे
radhamohan mishra एका तरुणीवर तब्बल १७ वर्षे लैंगिक अत्याचार आणि अमानुष छळ केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदूबाबा राधामोहन मिश्राच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता त्याच्यासह आणखी ११ जणांविरुद्ध पुण्यातील खराडी पोलीस ठाण्यात नवीन गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी ईशान राजन कक्कर (वय ३५, रा. सेंट्रल चौक, नांदे, ता. हवेली) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, सामाजिक उद्दिष्टाच्या नावाखाली तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या जागेवरील हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना जागा सोडण्यास भाग पाडण्यासाठी आरोपींनी संगनमत करून मारहाण आणि धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी तक्रारदाराला लाकडी दांडक्याने पाठीवर आणि पोटावर मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.
नेमका वाद काय?
तक्रारीनुसार, सामाजिक उद्दिष्टाच्या नावाखाली तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना जातीयदृष्ट्या बदनाम करण्यात आल्याचा राग आरोपींनी मनात धरला होता. त्याच पार्श्वभूमीवर ४ जुलै रोजी सर्व आरोपी एकत्र आले आणि तक्रारदाराचा जागेतील हिस्सा काढून घेण्याचा तसेच त्यांना तेथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.यापूर्वी एका तरुणीवर सलग १७ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी राधामोहन मिश्राला अटक करण्यात आली होती. त्यानंतर धैर्य एकवटत या प्रकरणातील तक्रारदारानेही पोलिसांकडे धाव घेत आपली तक्रार नोंदवली. या फिर्यादीच्या आधारे खराडी पोलिसांनी राधामोहन मिश्रासह अन्य आरोपींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नव्याने दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे मिश्राच्या कायदेशीर अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.