पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामटे यांचे निधन

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
पुणे
jalinder kamte पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते जालिंदर कामटे यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
 

former pune zilla parishad president jalinder kamte dies, veteran maharashtra leader passes away 
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री जेवणानंतर कामटे आपल्या खोलीत विश्रांतीसाठी गेले होते. मात्र, नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी ते उठले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास खोलीचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले आणि वानवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सायंकाळी कोंढवा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
 
 
हवेली तालुक्यातील कोंढवा हे jalinder kamte जालिंदर कामटे यांचे मूळ गाव होते. १९९९ ते २००२ या कालावधीत त्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. विद्यार्थी संघटनांमधील कार्यातून त्यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली. पुणे शहरातील विद्यार्थी चळवळी आणि पुणे विद्यापीठाशी संबंधित विविध आंदोलनांमुळे ते जिल्हाभर परिचित झाले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांचे ते विश्वासू सहकारी मानले जात होते. त्यांच्या पत्नी जयश्री कामटे यांनी १९९२ ते १९९८ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून काम पाहिले. जालिंदर कामटे १९९७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यानंतर १९९९ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. पुढे २०१५ ते २०१८ या काळात त्यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली. हवेलीबरोबरच पुरंदर तालुक्यातही त्यांनी आपले राजकीय कार्यक्षेत्र विस्तारले.स्वर्गीय वसंतदादा पाटील यांना ते आपले राजकीय मार्गदर्शक मानत असत. त्यांच्या प्रेरणेने त्यांनी कोंढवा येथे शाळेची स्थापना केली. काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा पुणे जिल्ह्यात कामटे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. त्यावेळची समर्थकांची पहिली बैठक त्यांच्या क्वीन्स गार्डन येथील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्याच्या आवारात झाल्याची नोंद आहे.
 
 
राजकीय कारकिर्दीत काही काळ त्यांनी भारतीय जनता पक्षातही काम केले. त्यानंतर सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियपणे कार्य सुरू केले. सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा मोठा सहभाग होता. स्वर्गीय रामभाऊ बराटे यांच्या स्मरणार्थ त्यांनी आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी पुरस्कार सुरू केला. तसेच सामाजिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठीही विविध पुरस्कारांची स्थापना केली.
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील ‘मथुरा’ आणि त्यानंतरचा ‘सुभद्रा कट्टा’ हे गेल्या तीन ते चार दशकांपासून राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जात होते. या व्यासपीठांना व्यापक ओळख मिळवून देण्यात जालिंदर कामटे यांचा मोठा वाटा मानला जातो.