गिरिजा ओकचा वडिलांसोबतच्या नात्याबद्दल भावूक खुलासा

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
मुंबई
girija oak निळ्या साडीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. सध्या ती ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटामुळेही चर्चेत असून, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या वडिलांबरोबरच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. गिरिजा ही मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते गिरिश ओक यांची मुलगी आहे.
 

girija oak  
गिरिजा लहान असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर गिरिश ओक यांनी दुसरा संसार थाटला. या पार्श्वभूमीवर वडिलांशी असलेल्या नात्याबद्दल बोलताना गिरिजाने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, “मी लहान असताना सर्वात मोठी फॅन बाबांची होते. त्यांची जवळपास सगळी नाटकं मी पाहिली आहेत. अगदी पाठ होईपर्यंत त्यांची नाटकं मी पाहिली आहेत. त्यांच्या प्रत्येक नाटकाचे 20-20 प्रयोग मी पाहिले असतील. बाबांची नाटकं आणि बाबांचं काम पाहत मी मोठी झाले. पण कालांतराने माझे आई-वडील विभक्त झाले. त्यानंतर मी माझ्या आईसोबत राहू लागले. त्यामुळे बाबांसोबत माझा फारसा संपर्क आला नाही. पण एक कलाकार म्हणून माझ्या मनात त्यांच्याविषयी फार आदर आहे.”
 
 
गिरिजाने पुढे स्पष्ट केले की, आज तिचा वडिलांशी रोजचा संपर्क नसला तरी त्यांच्या कामाविषयीचा आदर कायम आहे. ती म्हणाली, “आतापर्यंत त्यांनी जे काही काम केलं आहे, ते स्वकष्टाने केलं आहे. त्याबद्दल मला आदर आणि अभिमान आहे. आता आम्ही फार संपर्कात नाही, कारण मी माझ्या आईकडे राहायला लागले. त्यांचंही एक वेगळं कुटुंब आहे—बायको आहे, मुलगी आहे, सगळं उत्तम आहे. कुटुंब एकत्र आलं की भेटणं-बोलणं होतं, पण रोजचं बोलणं होत नाही. मला माझं आयुष्य आहे, त्यांना त्यांचं आयुष्य आहे.”
 
 
तिने यावेळी हेही सांगितले की, लोक आजही तिची ओळख वडिलांच्या नावाने करून देतात, याचा तिला आनंद वाटतो. “आजही लोक मला विचारतात, ‘तुम्ही गिरिश ओक यांची मुलगी ना?’ असं विचारलं की मला खूप आनंद होतो. एवढंच नाही तर, तुम्ही तुमच्या वडिलांसारखं काम करता असं ऐकल्यावर आणखी छान वाटतं,” असेही गिरिजा ओकने मुलाखतीत सांगितले.