गोंदियाच्या नगराध्यक्षांची सायकलने ‘पंढरपूर वारी’

कारगिल वीराचाही सहभाग : संडे सायकलिंग ग्रुपचा उपक्रम

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
गोंदिया,
padharnpur wari मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचीही तमा न बाळगता गोंदिया शहरातील संडे सायकलिंग ग्रुपच्या सायकलवीरांनी बुधवारी 1 जुलै रोजी सकाळी पंढरपूर वारीला प्रस्थान केले. ओल्या रस्त्यांवर, अंगावर शिंतोडे उडवत हे चार वीर गोंदियाहून विठुरायाच्या दर्शनासाठी आणि जिल्ह्याच्या भल्यासाठी निघाले आहेत. नगराध्यक्ष सचिन शेंडे, कारगिल युद्धात एक पाय गमावलेले माजी सैनिक उदयभान निर्माण, घनश्याम उइके आणि मनोज बिसेन अशी या सायकलवारीतील वीरांची नावे आहेत.
 

padharnpur wari  
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शेतकर्‍यांच्या शेतात धानाचे भरघोस पीक यावे यासाठी विठुरायाच्या चरणी साकडे घालणे हा या वारीचा मुख्य उद्देश आहे. सकाळपासूनच पाऊस सुरू असतानाही हे सायकलस्वार डगमगले नाहीत. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी गोंदिया शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांसमोर नतमस्तक होऊन त्यांनी या वारीचा शुभारंभ केला. रवाना होताना जयस्तंभ चौक आणि शहरातील मार्गावर गोंदियातील नागरकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी फुलांचा वर्षाव, ‘जय विठोबा’, ‘ज्ञानबा तुकाराम’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. ओले होऊनही लोकांनी या सायकलवीरांना निरोप दिला. या वारीतील सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे कारगिल योद्धा उदयभान निर्माण यांचा सहभाग होता. 1999 च्या कारगिल युद्धात एक पाय गमावल्यानंतरही देशभक्ती आणि जिद्दीने ते पंढरीची वाट धरत आहेत. त्यांची जिद्द पाहून उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांनीही वाट मोकळी केली. गोंदिया ते पंढरपूर हा सुमारे 800 किमीचा खडतर प्रवास हे सायकलस्वार पुढील 4 ते 5 दिवसांत पूर्ण करणार आहेत. पावसात, ऊन-वार्‍यात रात्रंदिवस प्रवास करत ते महाराष्ट्राची वारी परंपरा जपणार आहेत.
पर्यावराणाचाही संदेश...
गोंदिया-भंडारा हा धानाचा padharnpur wari जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी सुखी व्हावा, पिकांना भाव मिळावा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही विठुरायाकडे प्रार्थना करणार आहोत. यासोबत ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, इंधन वाचवा, देश वाचवा’ हा पर्यावरणपूरक संदेशही आम्ही वाटेत प्रत्येक गावात देणार असल्याचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी यावेळी सांगितले.