देवळीत पावसाचा कहर; पूल गेला वाहून

पांदण रस्तेही खरडून निघाले

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
देवळी,
rain यंदा पाऊस उशिराने आला, पण पाऊस सुरू होताच शेतकर्यांचे बांध, नाल्यांवरील पूल, पांदण रस्तेही वाहून नेले आहे.देवळी तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूल, रपटे आणि लहान नाल्यांवरील बांधकामे वाहून गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 

heavy rain in deoli washes away bridge and damages rural roads disrupts farmers movement 
जामणी ते पडेगाव मार्गावरील पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली तसेच मुरदगाव (खो.) येथील फत्तेपूर पांदण रस्त्यावरील नाल्याचा पूल वाहून गेल्यामुळे जवळपास १०० शेतकर्यांचा शेतात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. या ठिकाणी पायी जाणेही धोकादायक बनले आहे. दरम्यान, देवळी ते डिगडोह मार्गावरील यशोदा नदीवरील सुमारे ५ कोटी ५४ लाख रुपये खर्चून नव्यानेच बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूंचा रस्ता सहा ते आठ इंचानी खचला आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. ४० मीटर लांबी व १० मीटर रुंदीच्या या पुलाच्या स्लॅबवर सुरूवातीपासूनच तडे दिसत असल्याने या पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय दीघी ते बोपापूर मार्गावरील पांदण रस्त्यांवरील नाले वाहून गेल्याने अनेक शेतकर्यांच्या शेतात जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे शेतीची कामे ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.