६ जुलैपर्यंत राज्यात अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यांचा इशारा

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Heavy rainfall warning for the state. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार ६ जुलैदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण भागावर द्रोणीय रेषा (ट्रफ लाईन) तयार झाल्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातही व्यापक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तर मराठवाड्यात २ आणि ३ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
 
 

y678 
 
२ ते ४ जुलैदरम्यान कोकणातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः घाटमाथ्यावर २ आणि ३ जुलै रोजी अत्यंत मुसळधार पावसाचा धोका असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ४ ते ६ जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्येही अतिवृष्टीची शक्यता कायम राहणार आहे. ४ जुलैदरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या काळात अचानक हवामान बदल होण्याची शक्यता असल्याने प्रवास करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
 
 
सखल भागांमध्ये पाणी साचणे, शहरांमध्ये जलमय परिस्थिती निर्माण होणे तसेच घाट रस्त्यांवर भूस्खलन होऊन वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासापूर्वी रस्त्यांची स्थिती तपासण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मच्छीमारांनी खराब हवामानामुळे समुद्रात जाणे टाळावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी भातशेती आणि भाजीपाला रोपवाटिकांमध्ये साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची तसेच मुसळधार पावसाच्या काळात जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची काळजी घ्यावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.