एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर आजपासून कारवाईचा धडाका

आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना कारवाईचे आदेश : हजार रुपये होणार दंड

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
hsrp number plate राज्यातील सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य करण्यात आले असून आज मंगळवारपासून (१ जुलै) एचएसआरपी नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
 

hsrp number plate 
शहरातील ५० टक्के वाहने एचएसआरपीविना
यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली असून कारवाईचा धडाका लावण्यात येणार आहे, अशी माहिती आरटीओ कार्यालयाने दिली आहे. नागपूर शहर आरटीओ अंतर्गत नोंद असलेल्या ४ लाख ३७ हजार ३१३ वाहनांपैकी केवळ २ लाख ३६ हजार २७२ वाहनांवरच एचएसआरपी बसविण्यात आली आहे. तर सारखीच स्थिती ग्रामीणमध्येसुद्धा आहे. त्यामुळे ४ लाख ८६ हजार वाहने अद्यापही एचएसआरपीविना आहेत.
 
 
 
राज्यातील प्रत्येक वाहनावर नवीन नंबर प्लेट (एचएसआरपी) असणे बंधनकारक करण्यात आले होते. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी परिवहन विभागाने आतापर्यंत सहा वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र, परिवहन आयुक्तांनी आता कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करत सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. वाहनांवर एचएसआरपी नसल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. वाहनांवर नवीन नंबर प्लेट बसविण्याची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत होती. यानंतर आता कोणत्याही स्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता १ जुलैपासून म्हणजेच मंगळपासून रस्त्यावर धावणाऱ्या एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर राज्यभरात दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे. नागपूर शहर आरटीओ (एमएच-३१) अंतर्गत नोंद असलेल्या ४ लाख ३७ हजार ३१३ वाहनांपैकी केवळ २ लाख ३६ हजार २७२ म्हणजेच ५४.२ टक्के वाहनांवरच एचएसआरपी बसविण्यात आली आहे. त्यामुळे २ लाख १ हजार ४१ वाहने अद्यापही एचएसआरपीविना आहेत. तर, पूर्व नागपूर एआरटीओ २ (एमएच-४९) अंतर्गत नोंद असलेल्या ४ लाख ३५ हजार १६० वाहनांपैकी २ लाख ५९ हजार ५८३ म्हणजेच ५७.५८ टक्के वाहनांनी एचएसआरपी बसविली आली आहे. १ लाख ७५ हजार २१४ वाहने अद्यापही जुन्याच नंबरप्लेटसह धावत आहेत. दोन्ही परिवहन कार्यालयांतील आकडेवारीनुसार, शहरातील ४ लाख ८६ हजार ८५५ वाहनांवर अद्यापही नवीन नंबर प्लेट बसविण्यात आली नाही.
 
 
... तर दंडातून मिळणार सूट
 
मंगळवारपासून वाहतूक पोलिस आणि आरटीओ अधिकारी विशेष मोहीम राबवून विना एचएसआरपी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत. मात्र, जर वाहनचालकाने ३० जूनपर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केली असल्यास त्यांनी दंडात्मक कारवाईतून सूट मिळणार आहे. ऑनलाईन नोंदणी केल्याची पावती दाखविल्यास त्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार नाही.
एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर मंगळवार पासून कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे आदेशाचे पालन करण्यात येईल. एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
संतोष काटकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर
एचएसआरपी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर आज मंगळपासून वाहतूक पोलिस आणि आरटीओ विभाग संयुक्त कारवाई करणार आहेत. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना कारवाईबाबत सूचना दिल्या आहेत.
- आदित्य मिरखेलकर (पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, नागपूर पोलिस)