सातारा
london to pandharpur पंढरपूरच्या वारीची गौरवशाली परंपरा आता सातासमुद्रापार पोहोचली असून, परदेशातील भाविकांनाही भुरळ घातली आहे. इंग्लंडमधील लंडन येथील रॉयल विंडसर रेसकोर्समधून ६ जून २०२६ रोजी ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल’च्या अखंड जयघोषात जगातील पहिल्या ‘ग्लोबल वारी’चा भव्य प्रारंभ झाला. कपाळी गंध, हाती भागवत ध्वज आणि विठुरायाचा गजर करत ही दिंडी लंडनमधून मार्गस्थ झाली असून, या अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी झालेल्या भारतीय वारकऱ्यांचा अथांग भक्तिभाव पाहून परदेशी नागरिकही मंत्रमुग्ध झाले आहेत. अनेकांनी प्रत्यक्ष सहभागी होत वारीचा अनुभवही घेतला आहे.
ही ग्लोबल वारी युरोप आणि आशियातील एकूण ११ देशांतून सुमारे ५० दिवसांचा प्रवास करणार असून, इंग्लंड, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, लक्झेम्बर्ग, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगेरी, तुर्की आणि अखेरीस जॉर्जिया असा तिचा मार्ग आहे. या संपूर्ण प्रवासात ‘रिले’ पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रत्येक देशातील स्थानिक भाविक संबंधित देशात पादुकांसह प्रवास करून त्या पुढील देशातील भारतीयांकडे त्या सुपूर्द करतात. शेवटी जॉर्जियातून या पवित्र पादुका विमानाने मुंबईत आणल्या जातील आणि तेथून आळंदीला नेल्या जातील. त्यानंतर आळंदी येथून त्या नेहमीप्रमाणे मुख्य पालखी सोहळ्यात सामील होऊन पंढरपूरकडे प्रस्थान करतील.
या अनोख्या वारीची मूळ संकल्पना अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याचे सुपुत्र अनिल खेडकर यांची आहे. शिक्षणासाठी लंडनला गेलेले खेडकर नंतर तेथेच स्थायिक झाले. त्यांच्या आईच्या वारीतील सहभागामुळे त्यांच्या मनात विठ्ठलभक्तीची ओढ निर्माण झाली. २०१७ मध्ये त्यांनी माउलींच्या पालखी सोहळ्यातील वाकडकर दिंडीतून वारीची सुरुवात केली. लंडनमध्ये विविध धर्मांची प्रार्थनास्थळे असताना विठुरायाचे मंदिर नसल्याची उणीव जाणवल्याने त्यांनी तेथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारण्याचा संकल्प केला असून, याला युरोपमधील अनिवासी भारतीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमात साताऱ्यातील बोरी (ता. खंडाळा) येथील विनोद धायगुडे यांचाही सह-संकल्पक म्हणून सहभाग आहे. एप्रिल २०२५ मध्ये भारतातून पांडुरंगाच्या पादुका ७० दिवसांच्या प्रवासानंतर लंडनमध्ये नेण्यात आल्या होत्या, जिथे ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. याच अनुभवातून ‘लंडन ते पंढरपूर’ या ग्लोबल वारीची संकल्पना प्रत्यक्षात आली असून, यामुळे परदेशातील तरुण पिढीला वारकरी संप्रदाय व साहित्याची ओळख होणार आहे.दरम्यान, हंगेरीतील बुडापेस्ट येथे या वारीचे अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विठुरायाच्या पादुकांचे भारतीय तसेच स्थानिक हंगेरियन भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. या भक्तिमय सोहळ्यात सुमारे १५० भारतीय व हंगेरियन नागरिक एकत्र आले होते, अशी माहिती बुडापेस्ट येथील वारीचे प्रतिनिधी विनोद धायगुडे यांनी दिली.