मुंबई
maharashtra farmers आज महाराष्ट्र कृषीदिनानिमित्त आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची, भविष्यातील उपक्रमांची आणि कृषी विकासाच्या धोरणाची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी शेती क्षेत्रातील यांत्रिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), प्रमाणित बियाणे, फलोत्पादन, पशुपालन आणि शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, शेती क्षेत्रातील यांत्रिकीकरणासाठी सर्वाधिक अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिला आहे. तसेच, राज्यात आता सर्व प्रकारच्या बियाण्यांचे प्रमाणन (सर्टिफिकेशन) अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून सक्तीचे करण्यात आले आहे. या निर्णयामुळे बनावट बियाण्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल आणि शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावरही सरकारचा भर असल्याचे सांगताना फडणवीस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा उल्लेख केला. एआयचा वापर केल्यास शेतीतील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते, असे नमूद करत त्यांनी देशातील कृषी क्षेत्रावर आधारित पहिले एआय अॅप विकसित करण्यात आल्याची माहिती दिली. कृषी विभागाकडे हे अॅप उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील फलोत्पादन maharashtra farmers क्षेत्रात गेल्या तीन वर्षांत उल्लेखनीय प्रगती झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या काळात पशुपालन क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याचा सरकारचा विचार आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, विदर्भ आणि मराठवाड्यातील वातावरणीय बदलांचा विचार करून त्या भागातील शेती कशा पद्धतीने अधिक सक्षम आणि शाश्वत करता येईल, यावरही सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली. सध्या अनेक शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीच वीजपुरवठा होत असल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करत त्यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वर्षातील बारा महिने दिवसा वीजपुरवठा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. सध्या राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याची क्षमता उपलब्ध असून, हे वर्ष संपण्यापूर्वी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. सुरुवातीला शेतीसाठी दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जाईल आणि त्यानंतर हा कालावधी वाढवून १२ तासांपर्यंत करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.