मुंबई
maharashtra government राज्य सरकारकडून दुर्मिळ आणि शासकीय प्रकाशनांच्या उपलब्धतेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, आता ही सर्व पुस्तके नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने खरेदी करता येणार आहेत आणि ती थेट घरपोच मिळण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे शासकीय ग्रंथसंपदेचा वापर अधिक सुलभ आणि व्यापक होणार आहे.
शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने यासंदर्भात शासन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार “ऑनलाइन अँड काउंटर बुक स्टोअर ॲप्लिकेशन” विकसित करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू केले जाणार आहे. या माध्यमातून शासकीय प्रकाशनांची विक्री आणि घरपोच वितरणाची सुविधा उपलब्ध होईल. ही संपूर्ण व्यवस्था महाराष्ट्र शासनाच्या मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयाच्या ग्रंथालय व्यवस्थेच्या आधुनिकीकरण उपक्रमाचा एक भाग आहे. सध्या शासकीय प्रकाशनांची विक्री प्रामुख्याने रोख व्यवहाराद्वारे ग्रंथालयांमध्ये तसेच पुस्तक प्रदर्शनांमध्ये केली जाते. मात्र खासगी प्रकाशकांकडून पुस्तके ऑनलाइन आणि घरपोच उपलब्ध असताना, शासकीय प्रकाशनांची अशी सोय नागरिकांसाठी उपलब्ध नव्हती, ही बाब शासनाने लक्षात घेतली आहे.
या नव्या प्रणालीद्वारे ही दरी भरूनmaharashtra government काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रारंभी हा उपक्रम मुंबईतील शासकीय ग्रंथालयातून प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. देशभरातील वितरणासाठीही या पोर्टलचा वापर करता येणार असून, काउंटर आणि प्रदर्शन विक्रीची सुविधा पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय पुस्तक विक्री केंद्रांमध्येही सुरू राहणार आहे.
या प्रणालीचा विकास “महा IT कॉर्पोरेशन लिमिटेड” करणार असून, संचालनालयात दोन संगणक ऑपरेटर २४ तास कार्यरत ठेवले जाणार आहेत. घरपोच वितरणासाठी पुस्तकाचे वजन व अंतर यानुसार टपाल शुल्क निश्चित केले जाईल. टपाल विभाग दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत शुल्काचे बिल सादर करणार असून, नागरिकांकडून मिळालेल्या रकमेतील वितरण खर्च संबंधित विभागाकडून अदा केला जाणार आहे. या उपक्रमामुळे शासकीय प्रकाशने अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचतील आणि डिजिटल माध्यमातून पुस्तक वितरण व्यवस्था अधिक आधुनिक व कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.