अन् बाई म्हणाल्या... 'तू कसा असशील एलकुंचवार?'

‘झिम्मा’ आत्मचरित्रात उलगडला वाड्याचा चिरेबंदी प्रवास

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
पराग मगर,
नागपूर,
vijaya-mehta : मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात ‘होळी’ आणि ‘सुलतान’ या नाटकांचे प्रयोग सुरू होते. नाटकाचे लेखक महेश एलकुंचवार या प्रयोगाला येणार असा निरोप विजयाबाईंना श्री. पू. भागवत यांनी दिला. तितक्यात एक जण बाईंजवळ येत म्हणाला, मी नागपूरहून आलो आहे. बाई लगेच उत्तरल्या, एलकुंचवार नाही आले. त्यावर तो तरुण म्हणाला मीच एलकुंचवार. यावर बाई ओरडून म्हणाल्या ‘तू एलकुंचवार कसा असशील?’ त्या ओरडल्याने बाहेरचे प्रेक्षकही एकदम बघायला लागले. महेश एलकुंचवार यांच्या पहिल्या भेटीचा मजेशीर किस्सा आणि त्यांच्या वाडा चिरेबंदी नाटकाचा नाट्यमय प्रवास विजया मेहता यांनी त्यांच्या ‘झिम्मा’ या आत्मचरित्रात फार आत्मियतेने लिहिला आहे.
 

VIJAYA 
 
 
‘रंगायन’च्या माध्यमातून मराठी प्रायोगिक नाटकांची चळवळ उभी करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री व दिग्दर्शिका विजया मेहता यांचे मंगळवारी निधन झाले. नागपूरसह विदर्भाशी त्यांचा फार जवळचा संबंध राहिला. त्याला निमित्त होते, प्रसिद्ध लेखक महेश एलकुचंवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचे. बाईंनी आत्मचरित्रात या नाटकाच्या निमित्ताने विदर्भातील तत्कालीन वाडा-संस्कृतीचे मार्मिक विश्लेषण केले आहे. त्या स्वत: एलकुंचवारांसोबत त्यांच्या अकोला जिल्ह्यातील शिरपूर या गावी जाऊन त्यांच्या वाड्यात राहिल्या. एलकुंचवारांच्या वाड्याचे छान वर्णनही त्यांनी या पुस्तकात केले आहे.
वऱ्हाडी लहेजा मला जमलाच नाही
 
वाडा चिरेबंदी हे नाटक विदर्भाच्या संस्कृतीचे दर्शन घडविते. त्यामुळे नाटकात येथील वऱ्हाडी बोलीचाही विशेष वापर एलकुंचवारांनी केला आहे. विजयाबाईंनी बसविलेल्या या नाटकात त्यांनी स्वत: आईची भूमिका केली. त्या सांगतात, मला तिथे असताना वऱ्हाडी बोली ऐकताच आली नाही. शेवटी आईचे संवाद एलकुंचवारांनी त्यांना रेकॉर्ड करून पाठविले. पण मला या बोलीचा लहेजा आणि लय सापडलीच नाही, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी या आत्मकथनात दिली आहे.
 
 
पुढच्या दोन्ही संहिता आत्मकेंद्रित
 
 
एलकुंचवार आणि विजयाबाईंचा स्नेह कायम असला तरी नंतर त्यांनी सोबत काम केले नाही. त्या नमूद करतात, ‘महेशने वाडा चिरेबंदीचे पुढचे भाग लिहिले. मला वाचूनही दाखवले. परंतु मला ते पटले नाही. नंतरच्या भागांतील महेशची पात्रे आपल्या दु:खाचं, अडचणींचं तर्कशुद्ध विश्लेषण करू लागली. त्यामुळे दोन्ही संहिता मला आत्मकेंद्रित वाटल्या. आत्मशोधात मग्न असलेला महेश नाटककार एलकुंचवारवर स्वार झाला की काय’, असेही त्यांनी नमूद केले आहे.