ईशान अव्वल क्रमांकाचा फलंदाज, अभिषेकला धक्का!

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
icc-rankings : आयसीसी क्रमवारीत आणखी एक मोठा बदल झाला आहे. बऱ्याच काळापासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक शर्माने आता ते गमावले आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे भारताचा इशान किशन आता पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. टीम इंडियामधून वगळण्यात आलेल्या भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवलाही फटका बसला आहे. तो आता अव्वल १० मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेदरम्यान यात पुन्हा बदल होईल.
 
 
CRICKET
 
 
भारत विरुद्ध आयर्लंड टी-२० मालिका संपण्यापूर्वी आणि इंग्लंड मालिका सुरू होण्यापूर्वीच, आयसीसीने आपली नवीन आणि अद्ययावत क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा इशान किशन आता पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग ८७६ पर्यंत वाढले असून, ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च क्रमवारी आहे. त्याने पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावले आहे. यापूर्वी तो दुसऱ्या स्थानावर होता, त्याने एक स्थान वर झेप घेतली आहे.
दरम्यान, अभिषेक शर्मा एक स्थान खाली घसरला आहे. तो आता पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आला आहे. अभिषेकचे रेटिंग ८६९ पर्यंत घसरले आहे. तथापि, ईशान आणि अभिषेकच्या रँकिंग आणि रेटिंगमध्ये फारसा फरक नाही, त्यामुळे इंग्लंड टी२० मालिकेत हे दोन्ही फलंदाज खेळल्यावर यात पुन्हा बदल होऊ शकतो. इंग्लंड मालिकेत पाच सामने असतील.
भारतीय संघातून वगळण्यात आलेला सूर्यकुमार यादव एक स्थान खाली घसरला आहे. तो पूर्वी सातव्या क्रमांकावर होता, पण आता आठव्या स्थानावर घसरला आहे. भारतीय संघाने सूर्याशिवाय दोन सामने खेळले आहेत, त्यामुळे त्याचे रेटिंग घसरले आहे. याचा फायदा जॉस बटलरला झाला आहे. तो आता एक स्थान वर चढून सातव्या क्रमांकावर आला आहे. जॉस बटलरचे रेटिंग ७१६ आहे, तर सूर्याचे ७०८ आहे. टी२० रँकिंगमधील उर्वरित टॉप १० मध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना १ जुलै रोजी खेळला जाईल. या मालिकेतील कामगिरीच्या आधारावर भारतीय आणि इंग्लिश खेळाडूंच्या क्रमवारीची पुनर्रचना केली जाईल, जी अत्यंत महत्त्वाची ठरेल.