अट्टल मोबाईल चोरटा गजाआड

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
मालेगाव,
mobile thief रेल्वेतून प्रवाशांचे मोबाईल चोरून ते ग्रामीण भागात कमी किमतीत विकणार्‍या परभणी जिल्ह्यातील एका अट्टल चोरट्याला मालेगाव पोलिसांनी मेडशी येथे सापळा रचून अटक केली आहे. किशनलाल शंकरलाल तापडिया (वय ४०) रा. चाटोरी, ता. पालम, जि. परभणी असे या परभणीतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख ५३ हजार ५०० रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे १८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई ३० जून रोजी करण्यात आली.
 

mobile thief  
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील रहिवासी असलेला किशनलाल तापडिया हा मेडशी गावात संशयास्पदरीत्या फिरत असून तो कोणतीही पावती किंवा बिल नसलेले मोबाईल अत्यंत कमी किमतीत विकत असल्याची गुप्त माहिती मालेगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने मेडशी येथे जाऊन संशयित किशनलाल तापडिया याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या पाठीवरील बॅगची झडती घेतली असता, त्यात विविध नामांकित कंपन्यांचे १८ महागडे मोबाईल मिळून आले. या मोबाईलबाबत पोलिसांनी आरोपीकडे वैध कागदपत्रांची मागणी केली असता, त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला.
परभणी येथील आरोपी किशनलाल तापडिया याच्याविरुद्ध मालेगाव पोलिस ठाण्यात अप क्रमांक ४४३/२०२६ नुसार, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस पथकाची कामगिरी सदरची धडक कारवाई वाशीमचे जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षकलता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनात मालेगावचे पोलिस निरीक्षक राजेश खेरडे, पोलिस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार, पोलिस हवालदार सुनील पवार, मनीष राठोड, शिवाजी काळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार आणि वैभव झरकर यांच्या पथकाने केली आहे.