- प्रा. सुखदेव बखळे
Mumbai Monorail अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली मात्र बंद असलेली मुंबई मोनोरेल पुन्हा सुरू होण्याची बातमी मुंबईकरांसाठी आनंदाची ठरत आहे. विशेषतः मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी हा प्रकल्प वाहतुकीच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकतो. चेंबूर मेट्रो स्थानकाशी होणारी जोडणी, अत्याधुनिक तांत्रिक सुधारणा आणि वाढलेली प्रवासी सुविधा यामुळे मोनोरेल पुन्हा शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान मिळवू शकते.
मुंबईमध्ये मोनोरेल सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे शहरातील गर्दी कमी करणे आणि पर्यायी सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देणे हा होता. पारंपरिक रेल्वेमार्ग आणि रस्त्यांवर वाढत असलेल्या ताणामुळे नवीन वाहतूक व्यवस्थेची गरज निर्माण झाली होती. मोनोरेल ही एका उंच मार्गिकेवर धावणारी आधुनिक रेल्वे प्रणाली आहे. कमी जागेत उभारता येणारी आणि शहरी भागात प्रभावीपणे कार्य करू शकणारी ही व्यवस्था अनेक देशांमध्ये यशस्वी ठरली आहे. मुंबईतही या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांना जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंबई मोनोरेलचा मार्ग चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक असा सुमारे वीस किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गामुळे पूर्व उपनगरांपासून दक्षिण-मध्य मुंबईपर्यंतचा प्रवास अधिक सोपा होतो. पहिला टप्पा 2014 मध्ये सुरू झाला तर दुसरा टप्पा 2019 मध्ये कार्यान्वित झाला. सुरुवातीच्या काळात या प्रकल्पाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या; मात्र काही तांत्रिक समस्या, मर्यादित गाड्या आणि देखभालीशी संबंधित अडचणी यामुळे मोनोरेलला अपेक्षित यश मिळू शकले नाही, तरीही या मार्गाचे महत्त्व कायम राहिले. कारण इतर रेल्वे पर्याय तुलनेने कमी असलेल्या ठिकाणांना तो जोडतो. मोनोरेल पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. नवीन रोलिंग स्टॉकची जोडणी, सुरक्षा व्यवस्थेतील बदल आणि प्रगत ‘कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल’ (सीबीटीसी) सिग्नलिंग प्रणालीचा वापर यामुळे संपूर्ण नेटवर्क अधिक विश्वासार्ह बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या यंत्रणेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘सीबीटीसी’ तंत्रज्ञानामुळे गाड्यांमधील अंतर अधिक अचूकपणे नियंत्रित करता येते. त्यामुळे सुरक्षितता वाढते आणि सेवा अधिक नियमितपणे चालवता येते. आधुनिक महानगरांमध्ये अशा प्रकारची प्रणाली मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. याशिवाय स्थानकांवरील सुविधा, नियंत्रण व्यवस्था आणि तांत्रिक उपकरणांचेही आधुनिकीकरण करण्यात आले आहे. मोनोरेलच्या नव्या इनिंग्जमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे चेंबूर मेट्रो स्थानकाशी होणारी जोडणी. हे स्थानक मेट्रो नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. व्ही. एन. पुरव मोनोरेल स्थानक आणि चेंबूर मेट्रो स्थानक यांच्यातील अंतर अत्यंत कमी असल्याने प्रवाशांना एका वाहतूक व्यवस्थेतून दुसऱ्या व्यवस्थेत सहज जाता येणार आहे. यामुळे मुंबईतील बहुस्तरीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे. आजच्या काळात कोणतीही वाहतूक व्यवस्था स्वतंत्रपणे प्रभावी ठरत नाही. विविध वाहतूक साधनांमध्ये सुलभ बदल करता येणे हेच यशस्वी वाहतूक व्यवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य असते. चेंबूरमधील ही जोडणी त्याच दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पूर्व उपनगरांमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांना या पुनरारंभाचा थेट फायदा होणार आहे. चेंबूर, कुर्ला, टिळकनगर, वडाळा आणि आसपासच्या परिसरातील लोकांना कमी वेळेत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचता येईल. रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जातो. सार्वजनिक वाहतुकीचा प्रभावी पर्याय उपलब्ध झाल्यास हा वेळ मोठ्या प्रमाणात वाचू शकतो.
येत्या काळात कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मोनोरेल हा नव्याने एक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय ठरू शकतो. याशिवाय मेट्रोशी जोडणी झाल्यामुळे शहरातील इतर भागांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. मुंबईसारख्या शहरांमध्ये वाढते वायुप्रदूषण ही चिंतेची बाब आहे. खासगी वाहनांचा वापर जितका वाढतो, तितका पर्यावरणावरील ताण वाढतो. विद्युत ऊर्जेवर चालणारी मोनोरेलसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पर्यावरणपूरक मानली जाते. अधिक लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू लागल्यास इंधनाचा वापर कमी होईल आणि प्रदूषणात घट होण्यास मदत होईल. शाश्वत शहरी विकासासाठी अशा प्रकारच्या प्रकल्पांची आवश्यकता भविष्यात अधिक वाढणार आहे. वाहतूक व्यवस्था आणि आर्थिक विकास यांचा अतिशय जवळचा संबंध असतो. उत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध असणाऱ्या भागांमध्ये गुंतवणूक वाढते, रोजगारनिर्मिती होते आणि व्यावसायिक संधी निर्माण होतात. मोनोरेलच्या पुनरारंभामुळे पूर्व उपनगरांमधील अनेक भागांमध्ये व्यावसायिक हालचाली वाढू शकतात. लहान-मोठे उद्योग, दुकाने, सेवा व्यवसाय आणि रिअल इस्टेट क्षेत्रालाही याचा सकारात्मक परिणाम जाणवू शकतो. वाहतुकीतील सुधारणा म्हणजे केवळ प्रवासाची सोय नव्हे, तर संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणारी नवी ऊर्जा असते. मोनोरेल पुन्हा सुरू करणे हा प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे; मात्र दीर्घकालीन यशासाठी सातत्यपूर्ण देखभाल आणि दर्जेदार सेवा अत्यावश्यक आहे.
येत्या काळामध्ये गाड्यांची नियमित उपलब्धता, वेळेचे पालन, स्वच्छता, सुरक्षा आणि प्रवाशांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे अडचणींची पुनरावृत्ती टाळणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान असेल. तसेच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सुलभ तिकीट प्रणाली, एकात्मिक प्रवास कार्ड आणि इतर वाहतूक साधनांशी समन्वयावरही भर देणे आवश्यक आहे. मुंबईमध्ये मेट्रो नेटवर्कचा विस्तार वेगाने सुरू आहे. त्यासोबत मोनोरेलचे प्रभावी पुनरुज्जीवन झाले, तर शहराला बहुआयामी वाहतूक व्यवस्था मिळू शकते. रेल्वे, मेट्रो, मोनोरेल आणि बस सेवा यांचे एकात्मिक जाळे उभे राहिल्यास मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे परिवर्तन घडू शकते. भविष्यात अशा प्रकल्पांमुळे नागरिकांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मुंबईसाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जाऊ शकते. मुंबई मोनोरेलचे पुनरागमन ही केवळ एका वाहतूक सेवेची पुनर्सुरुवात नाही, तर शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील नव्या अध्यायाची सुरुवात आहे. प्रशासनाने सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह सेवा दिल्यास मोनोरेल मुंबईच्या वाहतुकीतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनू शकते. पूर्व उपनगरातील नागरिकांसाठी ही सुविधा वेळेची बचत, आरामदायी प्रवास आणि अधिक चांगल्या जीवनमानाची नवी संधी घेऊन येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या अपेक्षा आता या पुनरारंभाकडे लागल्या आहेत.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दररोज लाखो लोक रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि विविध कारणांसाठी शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करतात. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि मर्यादित रस्ते यामुळे वाहतूक कोंडी ही मुंबईकरांसमोरील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक बनली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार आणि आधुनिकीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरते. मुंबई मोनोरेलची संकल्पना 2008 मध्ये पुढे आली. वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी सार्वजनिक वाहतूक प्रणालीची गरज निर्माण झाली होती. त्यातून मोनोरेल प्रकल्पाचा जन्म झाला. हा प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून शहरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये कमी जागेत प्रभावी वाहतूक व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न होता. या प्रकल्पाचे दोन टप्प्यांमध्ये उद्घाटन करण्यात आले. पहिला टप्पा वडाळा ते चेंबूरदरम्यान 8.8 किलोमीटर लांबीचा असून दोन फेब्रुवारी 2014 रोजी सुरू झाला. दुसरा टप्पा वडाळा ते संत गाडगेमहाराज चौक दरम्यान 11.2 किलोमीटर लांबीचा असून चार मार्च 2019 रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. सुरुवातीला या प्रकल्पाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले गेले; मात्र विविध तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मोनोरेलला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. काही काळानंतर सेवा मर्यादित स्वरूपात सुरू राहिली आणि नंतर व्यापक सुधारणा करण्यासाठी ती स्थगित करण्यात आली.
Mumbai Monorail मोनोरेल सेवा बंद करण्यामागे अनेक कारणे होती. जुन्या रेक्सची क्षमता मर्यादित होती आणि काही वेळा तांत्रिक बिघाडामुळे सेवा विस्कळीत होत होती. प्रवाशांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था आवश्यक होती. याशिवाय आधुनिक सिग्नलिंग प्रणालीची गरजही जाणवत होती. त्यामुळे प्रगत ‘कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल’ (सीटीबीसी) तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या तंत्रज्ञानामुळे गाड्यांचे संचालन अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होते. तसेच नवीन रोलिंग स्टॉक, सुरक्षा यंत्रणांचे आधुनिकीकरण आणि देखभाल व्यवस्थेतील सुधारणा यासाठीही मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले. या सर्व सुधारणांसाठी काही काळ सेवा स्थगित ठेवणे अपरिहार्य होते. आता ही कामे जवळपास पूर्ण झाली असून मोनोरेल पुन्हा सेवेत येण्यास सज्ज आहे.