एलियनचे रहस्य उलगडणार? व्हाईट हाऊसची मोठी मोहीम सुरू

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
mystery of alien will be unravelled परग्रही जीवन खरोखर अस्तित्वात आहे का आणि आकाशात दिसणाऱ्या रहस्यमय उडणाऱ्या वस्तूंचे नेमके स्वरूप काय आहे, या प्रश्नांवर जगभरात अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. आता या रहस्यांचा अधिक सखोल तपास करण्यासाठी अमेरिकन प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. व्हाईट हाऊसने हार्वर्ड विद्यापीठाचे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ एव्ही लोएब यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवत नव्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे नेतृत्व दिले आहे. ही परिषद अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांनी अलिकडच्या वर्षांत पाहिलेल्या रहस्यमय गोलाकार वस्तू आणि इतर अज्ञात उडणाऱ्या घटनांचा तपास करणार आहे. या घटनांना आता अधिकृतपणे ‘अनआयडेंटिफाइड ॲनोमलस फिनॉमेना’ (यूएपी) असे संबोधले जाते. हा उपक्रम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या सरकारी माहिती अधिक पारदर्शक करण्याच्या योजनेचा भाग मानला जात आहे. लोएब यांचे पथक आपला अहवाल व्हाईट हाऊसच्या नव्या यूएपी समितीकडे सादर करणार आहे.
 
 

alien 
 
एवी लोएब हे परग्रही जीवनाच्या शक्यतेवर दीर्घकाळ संशोधन करत आहेत. २०१७ मध्ये पृथ्वीच्या जवळून गेलेल्या एका रहस्यमय आंतरतारकीय वस्तूबाबत त्यांनी ती परग्रही तंत्रज्ञानाशी संबंधित ‘लाइट सेल’ असू शकते, असा दावा केला होता. मात्र अनेक शास्त्रज्ञांनी तो दावा फेटाळत ती वस्तू धूमकेतू किंवा बर्फाचा तुकडा असण्याची शक्यता व्यक्त केली होती. या दाव्यामुळे वैज्ञानिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.लोएब यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या टीमचा तपास सुरुवातीला या गृहितकावर आधारित असेल की या रहस्यमय वस्तू मानवनिर्मित असू शकतात. तसेच संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तपासले जाईल. मात्र अधिक दर्जेदार डेटा उपलब्ध झाल्यास परग्रही जीवनाबाबत दशकांपासून सुरू असलेल्या चर्चेला स्पष्ट उत्तर मिळू शकते, असा त्यांचा विश्वास आहे. या पथकात डझनभराहून अधिक शास्त्रज्ञ आणि यूएपी संशोधकांचा समावेश आहे. यामध्ये अमेरिकन नौदलाचे निवृत्त रिअर ॲडमिरल टिमोथी गॅलॉडेट यांचाही समावेश आहे. त्यांनी यापूर्वी काही यूएपी घटना ‘मानवेतर बुद्धिमत्ते’शी संबंधित असू शकतात, असा दावा केला होता. तसेच उद्योजक बेन लॅम हेदेखील या टीमचा भाग आहेत. पहिल्या बैठकीनंतर या पथकाने पेंटागॉनकडे यूएपी संदर्भातील ५० हून अधिक व्हिडिओ, छायाचित्रे आणि दस्तऐवजांची मागणी केली आहे.
 
 
 
यावर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी UFO आणि परग्रही जीवनाशी संबंधित माहिती अधिक पारदर्शकपणे सार्वजनिक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पेंटागॉनने अनेक जुनी आणि नवी कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. यात दशकांपूर्वीच्या FBI नोंदींपासून ते रहस्यमय गोलाकार वस्तू उच्च वेगाने उडताना दाखवणाऱ्या अलीकडील लष्करी व्हिडिओंचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय गुप्तचर संचालक कार्यालयात यूएपी प्रशासन मंडळाची स्थापना करण्यात आली असून जूनमध्ये त्याची पहिली बैठक झाली.दरम्यान, अमेरिकी काँग्रेसमधील काही खासदार सरकारवर अधिक माहिती जाहीर करण्यासाठी दबाव आणत आहेत. काही नेत्यांनी सरकार परग्रहींशी संबंधित माहिती लपवत असल्याचा आरोप केला आहे. मात्र पेंटागॉनच्या विशेष तपास यंत्रणेने आतापर्यंत परग्रही जीवनाचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा सापडलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
एलियन विषयावरील दाव्यांपूर्वी एवी लोएब हे कृष्णविवरे आणि आकाशगंगांच्या निर्मितीवरील संशोधनासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी शेकडो वैज्ञानिक शोधनिबंध लिहिले असून जवळपास १० वर्षे हार्वर्डच्या खगोलशास्त्र विभागाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी हार्वर्डमध्ये गॅलिलिओ प्रकल्पाची सुरुवात केली होती, ज्याचा उद्देश एलियन संस्कृतींच्या संभाव्य अवशेषांचा शोध घेणे हा आहे. २०२३ मध्ये त्यांच्या टीमने पॅसिफिक महासागरातून मिळालेल्या लहान गोलाकार धातूच्या कणांचा परग्रही तंत्रज्ञानाशी संबंध असू शकतो, असा दावा केला होता. मात्र अनेक तज्ज्ञांनी ते ज्वालामुखीजन्य अवशेष किंवा कोळशाची राख असू शकते, असे म्हटले. पेंटागॉनच्या AARO चे माजी प्रमुख Sean Kirkpatrick यांनी लोएब यांच्या नियुक्तीवर टीका केली आहे. वैज्ञानिक समुदायात त्यांची प्रतिमा वादग्रस्त असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा अनुभव नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र या सर्व टीकेकडे दुर्लक्ष करत लोएब यांनी आपले लक्ष वैज्ञानिक तथ्यांवर केंद्रित राहील, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, आकाशातील रहस्यमय वस्तूंचा शोध वैज्ञानिक पद्धतीने घेणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.