मुंबई
pratap sarnaik महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संग तीर्थाटन योजनेचा विस्तार करण्यासाठी खासगी पर्यटन संस्थांना सहभागी करून घेण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील तीर्थयात्रा अधिक सुव्यवस्थित, एकात्मिक आणि प्रवाशांसाठी सुलभ होणार असून एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या व्यवस्थेत खासगी एजन्सींना प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या नॉन-ट्रान्सपोर्ट सेवांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. मात्र, बस संचालन आणि प्रवासी वाहतूक यावर एसटी महामंडळाचे नियंत्रण कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामागील उद्देश केवळ तीर्थाटन योजनेचा विस्तार करणे नसून प्रवाशांना एकाच ठिकाणी अधिक संघटित सेवा उपलब्ध करून देणे आणि राज्याच्या परिवहन महामंडळासाठी अतिरिक्त महसूल निर्माण करणे हा असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले आहे. खासगी सहभागामुळे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल आणि प्रवाशांना प्रवासादरम्यान अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असा सरकारचा दावा आहे.एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यासाठी आणि प्रवासी सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलचा वापर वाढवण्याच्या राज्य सरकारच्या व्यापक धोरणाचा हा भाग मानला जात आहे. तीर्थाटन योजनेतील हा बदल त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.