नवी दिल्ली,
rain amidst the interplay of two oceans. यंदाच्या मान्सूनबाबत सुरुवातीला करण्यात आलेले अंदाज चिंता वाढवणारे होते. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ सक्रिय असल्याने भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. कारण एल निनो ही हवामान प्रणाली सामान्यतः मान्सून कमकुवत करते आणि पावसाचे प्रमाण घटवते. मात्र आता हिंदी महासागरातून एक सकारात्मक घडामोड समोर येत असून त्यामुळे मान्सूनबाबत नव्याने आशा निर्माण झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, हिंदी महासागरात तयार होत असलेला ‘इंडियन ओशन डायपोल’ यंदा मान्सूनसाठी मोठा आधार ठरू शकतो. जर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत हा सकारात्मक अवस्थेत गेला, तर एल निनोचा नकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. अशा स्थितीत अरबी समुद्रातून आर्द्रता वाढून भारतात पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे.
शेती हंगामावर परिणाम होण्याची शक्यता
एल निनो आणि इंडियन ओशन डायपोल’या दोन्ही प्रणाली महासागरातील तापमानातील बदलांवर आधारित आहेत. प्रशांत महासागरातील पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम झाले की एल निनो तयार होतो आणि तो मान्सूनसाठी प्रतिकूल मानला जातो. यामुळे पावसाचे वारे कमजोर होतात आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो. याउलट, हिंदी महासागरातील आफ्रिकेकडील भाग अधिक गरम झाल्यास सकारात्मक इंडियन ओशन डायपोल’ तयार होतो. त्यामुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणात आर्द्रता तयार होऊन भारताकडे जोरदार वारे वाहतात आणि पावसाला चालना मिळते. सध्या देशातील अनेक भागांमध्ये अपेक्षित पावसाची कमतरता दिसून येत आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होऊनही अनेक राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले असून लागवडीखालील क्षेत्रातही घट झाली आहे. यामुळे शेती हंगामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे. तज्ज्ञांच्या मते, एल निनोचा प्रभाव टिकतो की ‘इंडियन ओशन डायपोल’ अधिक मजबूत होतो यावर पुढील काही महिन्यांचा पाऊस अवलंबून असेल. जर ‘इंडियन ओशन डायपोल’ वेळेवर सक्रिय झाला, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसात सुधारणा होण्याची शक्यता आहे. हवामान विभाग आणि जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार, सध्या ‘इंडियन ओशन डायपोल’ न्यूट्रल अवस्थेत आहे. मात्र जुलै-ऑगस्टमध्ये तो पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. समुद्रपृष्ठ तापमानात वाढ झाल्यास ही स्थिती अधिक बळकट होऊ शकते आणि मान्सूनला मोठी ताकद मिळू शकते. इतिहासातही अशा स्थितीचे उदाहरण पाहायला मिळते. १९९७ मध्ये तीव्र एल निनो असतानाही पॉझिटिव्ह ‘इंडियन ओशन डायपोल’ मुळे मान्सून तुलनेने स्थिर राहिला होता. त्यामुळे यंदाही ही नैसर्गिक प्रणाली भारतासाठी दिलासादायक ठरू शकते, अशी आशा हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.