मुंबई
rohit pawar राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठी खळबळ निर्माण झाली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक राजकीय धक्के बसताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. या घडामोडींवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सचिन अहिर हे पूर्वी आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. त्यांनी यापूर्वी रोहित पवार यांच्या पक्षातही काम केले होते, त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केले आणि आता ते एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. अशा प्रकारे नेत्यांनी वारंवार पक्ष बदलणे म्हणजे विचार आणि पक्ष न बदलता “कपडे बदलल्यासारखे” वाटते, असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या वर्तनामुळे अशा नेत्यांवरील विश्वास कमी होत जाईल, आणि लोकशाहीवरील जनतेचा विश्वासही डळमळीत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, हे प्रकार महाराष्ट्रासाठी घातक असून असे नेते स्वार्थी भूमिकेतून वागत असल्याने लोकांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. यामुळे भविष्यात नवीन चेहरे आणि नवे नेते पुढे येतील, असेही त्यांनी नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर पुढील राजकीय समीकरणांबाबत भाष्य करताना रोहित पवार यांनी आरोप केला की, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून आमदार-खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र कितीही प्रयत्न झाले तरी त्यांच्या गटातील आमदार आणि खासदार फुटणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच २०२९ मध्ये भाजपकडून सीमांकन कायद्यात बदल करून मतदारसंघांचे विभाजन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या भाजपला आणखी ४० खासदारांची गरज आहे, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळणार नाही आणि २०२९ मध्ये भाजप हा एकटा पक्ष उरेल, असेही त्यांनी ठामपणे म्हटले.
पुढे बोलताना रोहित पवार rohit pawar यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप नेत्यांमध्ये एकसमान समन्वय नसल्याचेही नमूद केले. त्यांच्या मते, पक्षांतर्गत वेगवेगळ्या पातळ्यांवर स्पर्धा सुरू असून एकमेकांना ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून पाठबळ मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करत, त्यामुळेच महाराष्ट्रात शिंदे गटाची ताकद वाढताना आणि त्याच वेळी भाजपशी संघर्ष दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार फोडण्याच्या प्रक्रियेत शिंदे गटाला यश मिळत असल्याने त्यांना केंद्रातून अधिक पाठबळ मिळत असल्याचेही ते म्हणाले.या सर्व घडामोडींमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये आगामी काळात अधिक संघर्ष पाहायला मिळेल आणि २०२९ च्या निवडणुकीत हे सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढू शकतात, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.