शिकवणी वर्गाचे छत कोसळले अन् १४ चिमुकल्यांचा अंत

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
लाहोर,
Roof of a tuition collapses in Lahore पाकिस्तानातील लाहोर शहरात मंगळवारी अत्यंत भीषण दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील एका खासगी शिकवणी केंद्राचे छत अचानक कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ मुलांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. काही मुले अजूनही ढिगाऱ्याखाली अडकली असण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.ही घटना लाहोरमधील दाट लोकवस्तीच्या काहना नाऊ परिसरात घडली. दुर्घटनेच्या वेळी सात ते १३ वयोगटातील ३० हून अधिक मुले अकादमीमध्ये शिकत होती. अचानक छत कोसळल्याने संपूर्ण वर्ग ढिगाऱ्याखाली गाडला गेला आणि एकच गोंधळ उडाला.
 
 
 
lahor
लाहोर पोलिसांचे उपमहानिरीक्षक (ऑपरेशन्स) फैसल कामरान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकांनी आतापर्यंत ढिगाऱ्याखालून १४ मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. याशिवाय २० जखमी मुले आणि एका महिला शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य अद्याप सुरू असून अडकलेल्या इतरांचा शोध घेतला जात आहे.प्राथमिक तपासात इमारतीच्या काही भागाचे बांधकाम सुरू असल्याचे समोर आले आहे. छत कोसळले तेव्हा घटनास्थळी कामगारही उपस्थित होते. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित कंत्राटदाराला अटक केली आहे. लाहोर जिल्हा शिक्षण प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तारिक महमूद यांनी सांगितले की, या भागात एका महिलेने खासगी शिकवणी केंद्र सुरू केले होते.
 
 
एधी फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, काहना नाऊ भागातील बस्ती ईदगाह परिसरातील निवासी इमारतीत ही अकादमी चालत होती. छत कोसळल्यानंतर सर्वत्र एकच हाहाकार माजला. मृतदेह लाहोर जनरल हॉस्पिटल शवागारात हलवण्यात आले आहेत. जखमी मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. बचावकार्य वेगाने सुरू ठेवण्यात आले असून एधी फाऊंडेशनच्या रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवा देखील तत्काळ पुरवण्यात येत आहेत. दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाजयांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला जबाबदार व्यक्तींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रांतीय आरोग्य विभागाने लाहोर जनरल हॉस्पिटलमध्ये आणीबाणी जाहीर केली असून डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.