नवी दिल्ली,
Sanju out, Vaibhav gets a chance आयर्लंडविरुद्धची दोन सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्यावर पोहोचला असून, १ जुलैपासून यजमान संघाविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर आता सर्वांचे लक्ष टीम इंडियाच्या कामगिरीकडे लागले आहे. पहिल्या सामन्यात अंतिम ११ मध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विशेषतः १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या संभाव्य पदार्पणाची जोरदार चर्चा रंगली आहे. वैभवला पहिल्याच सामन्यात संधी मिळणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी त्याच्या नावाने इंग्लंडच्या गोटात चर्चा सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
चेस्टर-ले-स्ट्रीट येथे सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने वैभव सूर्यवंशीबद्दल प्रतिक्रिया दिली. वैभवबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ब्रुक म्हणाला की, तो अत्यंत प्रतिभावान खेळाडू असून त्याने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याला त्याचा सर्वोत्तम खेळ करता येऊ नये यासाठी इंग्लंडने विशेष रणनीती आखली असल्याचेही त्याने स्पष्ट केले. तसेच १५ व्या वर्षी तो स्वतः काय करत होता, असे विचारल्यावर ब्रुकने हसत उत्तर दिले की, तो त्यावेळी यॉर्कशायरसाठी अकादमी क्रिकेट खेळत होता. दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यात संजू सॅमसन याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी मिळू शकते, अशी चर्चा रंगली आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत सॅमसनची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पहिल्या सामन्यात त्याने केवळ ५ धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात तो खातेही न उघडता बाद झाला. त्यामुळे त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी आपला अंतिम ११ जणांचा संघ सामना सुरू होण्याच्या अवघ्या २४ तास आधी जाहीर केला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ व्यवस्थापन कोणते निर्णय घेते आणि वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळते का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.