रावळकोट ,
Shaukat Nawaz Mir arrested in PoK पाकव्याप्त काश्मीर येथे सध्या पाकिस्तान सरकारविरोधातील आंदोलनाने मोठा भडका उडाला आहे. रावळकोट येथील ईदगाह मैदानावर हजारो नागरिक एकत्र येत त्यांनी “आम्ही पाकिस्तानचा भाग नाही” अशा घोषणा देत सरकारविरोधी रोष व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व जम्मू आणि काश्मीर आवामी ॲक्शन कमिटी करत असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिक तणावपूर्ण होत आहे. या संघटनेचे प्रमुख नेते शौकत नवाज मीर यांना धीरकोटच्या संगर फत्तारे भागातून त्यांच्या दोन साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. अहवालानुसार, त्यांच्यावर 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

पाकव्याप्त काश्मीर प्रशासनाने आतापर्यंत जेएएसीच्या 600 हून अधिक नेते आणि कार्यकर्ते ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या नेत्यांवर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत कारवाई सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. 5 जून रोजी या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर परिसरातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आंदोलनादरम्यान नेते सरदार अमन खान यांनी सरकारवर तीव्र टीका करत “आम्हाला तुमच्या रेशनची गरज नाही, तुम्हाला आमची गरज आहे” असे वक्तव्य केले. महागाई, अन्नटंचाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सुरू झालेले हे आंदोलन आता पूर्णपणे राजकीय स्वरूप धारण करत असल्याचे दिसत आहे.
अहवालांनुसार, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी रावळकोट आणि मीरपूर येथील नागरिकांना “खरे काश्मिरी नाहीत” असे वक्तव्य केल्यानेही आंदोलन अधिक भडकले आहे. या वक्तव्यामुळे स्थानिक जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जूनच्या सुरुवातीपासून पाकव्याप्त काश्मीर मधील अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा मर्यादित करण्यात आली आहे. आंदोलकांचा आरोप आहे की, आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर जाऊ नयेत म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यांत झालेल्या संघर्षांमध्ये किमान 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.