पुणे,
Shocking details of the Ketan case पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाला गती दिली असून आज लोहगड किल्ल्यावर अत्यंत थरारक ‘क्राइम सीन रिक्रिएशन’ करण्यात आले. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घटनास्थळी घेऊन जाऊन संपूर्ण घटनेचा पुनर्निर्माण करून पाहणी केली. लोहगड परिसरात मुसळधार पाऊस आणि दाट धुके असतानाही पोलिसांनी तपास सुरू ठेवला. केतनला दरीत कसे ढकलण्यात आले, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी केतनच्या वजनाइतका एक पुतळा तयार करून तो दरीत फेकण्यात आला. या प्रयोगादरम्यान पुतळा कोसळल्यानंतर तो खालील ३५० ते ४०० फूट खोल दरीतील खडकांवर आदळत तुकडे-तुकडे झाला, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
या घटनेत आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनला फेकण्यासाठी लोहगडावर निवडलेली जागा अत्यंत धोकादायक आणि थेट खोल दरीकडे झुकणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या मते, त्या ठिकाणाहून खाली ढकलल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत वाचण्याची शक्यता जवळपास शून्य होती. त्यामुळे ही जागा पूर्वनियोजितपणे निवडली गेल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. याआधी या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिला घटनास्थळी आणून स्वतंत्र ‘सीन रिक्रिएशन’ करण्यात आले होते. त्या वेळी केतनच्या उंची-भाराशी साधर्म्य असलेला डमी पुतळा वापरण्यात आला होता. सियाने त्या पुतळ्याला धक्का दिल्यानंतर तो थेट ३५० ते ४०० फूट खोल दरीत कोसळला आणि खडकांवर आदळत पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, जर कृत्रिम पुतळ्याची अशी अवस्था झाली असेल, तर प्रत्यक्ष केतनला झालेल्या जखमा अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या असण्याची शक्यता आहे. उभ्या खडकांवर आदळल्यामुळे डोक्याला आणि शरीराला मोठी दुखापत झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
आज चेतन चौधरीच्या उपस्थितीत पुन्हा एकदा घटनास्थळी तपास करण्यात आला. पोलिसांनी वेळ, अंतर आणि ढकलण्याच्या पद्धतीचा अभ्यास करत संपूर्ण घटनाक्रम पुन्हा उभा केला. या सीन रिक्रिएशननंतर आता तपासात महत्त्वाचा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः केतनला शेवटचा धक्का नेमका कोणी दिला, याबाबत पोलिसांना निर्णायक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिस आणि फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून पुढील चौकशीत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.