टीईटी घोटाळ्याचे कवीत्व

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
अग्रलेख...
TET scam शिक्षण ही कोणत्याही राष्ट्राची सर्वांत मोठी गुंतवणूक मानली जाते. इमारती उभारता येतात, वर्गखोल्या अद्ययावत करता येतात, पुस्तके छापता येतात, अभ्यासक्रम बदलता येतात, तंत्रज्ञान विकत घेता येते; पण उत्तम शिक्षक निर्माण करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. पैसे देऊन शिक्षकाला नोकरी मिळू शकते, मात्र त्याच्याकडून शिक्षण मिळू शकत नाही. शिक्षक घडावाच लागतो आणि तो तसा आहे काय यासाठी त्याचे मूल्यांकन करावेच लागते. शिक्षक हा समाजाच्या बौद्धिक आणि नैतिक पायाभरणीचा कारागीर असतो. म्हणूनच शिक्षक निवडीची प्रक्रिया जितकी निर्दोष, तितके राष्ट्र अधिक सुरक्षित असते. त्या प्रक्रियेवर संशय निर्माण झाला, की त्याचे पडसाद वर्गखोलीच्या चार भिंतींपलीकडे जातात आणि दीर्घ काळ त्याचे परिणाम जाणवत राहतात.
 
 
tet s
 
दिवसागणिक नवे-नवे खुलासे ज्यात होत आहेत, अशा महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटीच्या घोटाळ्याने हाच प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. प्रश्नपत्रिका फुटणे, गुणांमध्ये फेरफार, बनावट प्रमाणपत्रे, दलालांचे जाळे आणि प्रशासकीय संगनमत हा सारा एका चौकडीचा गेम दिसतो. शिक्षण क्षेत्राला जडलेल्या आजाराची ही लक्षणे आहेत. प्रत्येक वेळी काही आरोपी अटक होतात, चौकशी समित्या नेमल्या जातात आणि काही महिन्यांनी विषय मागे पडतो. पुढच्या भरतीत पुन्हा एखादा नवा घोटाळा समोर येतो. याचा अर्थ व्यक्ती बदलत असतात; पण व्यवस्था बदलत नाही. एका तत्त्वज्ञाचे सुप्रसिद्ध वचन आहे. तो म्हणतो- राष्ट्राची शक्ती औपचारिक आणि अनौपचारिक अशा शिक्षणातून विकसित होत असते." त्या शिक्षणाची पहिली अट म्हणजे शिक्षकावर असलेला समाजाचा विश्वास. तोच डळमळीत झाला, तर अभ्यासक्रम कितीही आधुनिक असला तरी त्याचा उपयोग शून्य ठरतो. टीईटीची संकल्पना गुणवत्तेच्या संरक्षणासाठी होती. शिक्षक भरतीवर पैसा, शिफारस आणि राजकीय दबाव यांचा प्रभाव कमी व्हावा, हा तिचा हेतू. कारण आधीच आपल्या शिक्षण क्षेत्राला भयंकर कीड लागलेली आहे. गेल्या काही दशकांत खाजगी शाळा-महाविद्यालयांमध्ये भरभक्कम डोनेशन्स घेऊन शिक्षक भरती केली गेली. ज्याला दोन वाक्ये निर्दोष इंग्रजी लिहिता येत नाही, तो इंग्रजीचा मास्तर झाला. ज्याला नकाशा कसा पाहावा हे कळत नाही, तो भूगोलाचा शिक्षक झाला. त्यामुळे किमान दोन पिढ्यांचे नुकसान झाले. त्यातून दिसणारे चित्र असे की, पदव्या भरपूर असतात, पण पाच-सात ओळींचे पत्र नीट लिहिता येत नाही. साधा अर्ज करता येत नाही. स्वतःच्या नावाचेच स्पेलिंग चुकविणारे लोकही याच व्यवस्थेतून निर्माण झाले आहेत. त्यांना साधे-सोपे भाषांतर करता येत नाही. इंग्रजी तर सोडा, मराठीही धड येत नाही. अशा पिढ्यांना रोजगार कसा मिळणार आणि मिळाला तरी तो टिकणार कसा, याचा कुणीही विचार केला नाही. यावर अनेक उपाय झाले. टीईटी हा त्यातलाच एक उपाय. पण, तिचे पेपर फोडण्याचा पराक्रम आपल्या लोकांनी केला. आता त्याची फळे हजारो शिक्षक भोगत आहेत. नीटच्या पेपरफुटीच्या पाठोपाठ टीईटीचा पेपर फुटला. म्हणजे विद्यार्थ्यांसाठीचेच नव्हे तर मास्तरांसाठी असलेले पेपरही फोडले गेले. त्याचे कारण म्हणजे शॉर्टकट मारण्याची आपल्या समाजाला असलेली वाईट सवय. या सवयीने अनेक पिढ्यांचे नुकसान होतेय, हे कुणाच्याही गावी नाही. परीक्षेचा पेपर फुटतो तेव्हा दोष फक्त एका व्यक्तिपुरता नसतो. पेपर फोडणाऱ्याकडे गिऱ्हाईक असते म्हणून तो ते करतो. दोघांनाही लोभ असतो. पेपर फोडणाऱ्याला पैशाचा आणि फुटलेला पेपर घेऊन परीक्षेला बसणाऱ्याला शॉर्टकटने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा. "काम झाले की झाले, बाकी काहीही पाहायचे नसते," हा दृष्टिकोन आणि गुणवत्तेपेक्षा भ्रष्ट मार्ग शोधण्याची प्रवृत्ती हे याचे खरे कारण होय. कष्टाला आणि प्रामाणिकपणाला किंमत नाही आणि भ्रष्ट मार्गाने जो यशस्वी झाल्याचे दाखवत असतो, त्याच्या चढत्या कमानीला अंत नाही, अशी आपल्या समाजाची स्थिती. अशात पेपरफुटीसारखी प्रकरणे घडणारच. कोणतीही पेपरफूट ही एका व्यक्तीच्या लोभातून घडत नाही, हेही तेवढेच खरे. प्रश्नपत्रिका तयार करणारा, ती छापणारा, वाहतूक करणारा, सुरक्षित ठेवणारा, परीक्षा घेणारा आणि निकाल प्रक्रिया सांभाळणारा या संपूर्ण साखळीत कुठेतरी जबाबदारीचे सकारण विस्मरण झाले असते. अनेक हातांमधून जाणाऱ्या प्रक्रियेत प्रत्येकाची जबाबदारी थोडीथोडी विरघळते आणि शेवटी दोष कोणाचा, हा प्रश्नच अनुत्तरित राहतो. म्हणून प्रत्येक घोटाळ्यानंतर आरोपी शोधण्याइतकेच महत्त्वाचे काम म्हणजे मूळ प्रक्रिया तपासणे आणि तिच्या प्रत्येक टप्प्यावर तिची वळणे योग्य होती काय, याचा छडा लावणे. तशी चौकशी सुरू झाली आहे, याचे समाधान वाटते. परंतु, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याचीही तजवीज सरकारला करावी लागेल.
 
 
टीईटी पेपरफुटीच्या दोषींना कठोरतम शिक्षा देणे आवश्यक आहेच. ती होईलही. पण, प्रश्नपत्रिका व्यवस्थापनासाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, प्रत्येक टप्प्याचे डिजिटल लॉगिंग, स्वतंत्र तांत्रिक लेखापरीक्षण, परीक्षा संस्थांचे नियमित बाह्य ऑडिट आणि गैरव्यवहार उघड करणाऱ्यांना कायदेशीर संरक्षण हे सारे आता अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक पेपरफुटीनंतर चौकशी समिती नेमण्याची परंपरा आहे. पण त्या समित्यांच्या शिफारशींची अंमलबजावणी कोण करतो आणि ती योग्यरीत्या झाली की नाही याचे मूल्यांकन कोण करतो, हा प्रश्न कायम अनुत्तरित राहिलेला आहे. आता तरी तसे घडू नये. शिक्षक भरतीची प्रक्रिया ही पारदर्शकच असली पाहिजे. आणि त्यासाठी टीईटीसारखी परीक्षा ही अत्यंत काटेकोरपणे घेतली गेली पाहिजे.
 
 
TET scam  दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भरती प्रक्रियेतील विलंब. वर्षानुवर्षे भरती रखडते. लाखो उमेदवार अनिश्चिततेत अडकतात. अशा वातावरणात दलाल, एजंट आणि अवैध व्यवहार करणाऱ्यांचे रान माजते. परीक्षा जितकी कठीण आणि भरती जितकी विलंबित, तितकी भ्रष्टाचाराची कीड वाढत जाते. त्यामुळे नियमित, कालबद्ध भरती हीसुद्धा भ्रष्टाचारविरोधी उपाययोजनाच आहे. शिक्षक मान्यतेसाठी लाखो रुपये शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना द्यावे लागतात, हे आता उघड गुपित आहे. शिक्षण खाते प्रचंड भ्रष्टाचाराने पोखरलेले आहेच. शालार्थ घोटाळ्यात त्याची अत्यंत कुरुप बाजू उघड झाली. आता टीईटीचा पेपर फुटला आणि त्याची चौकशी सुरू झाली. शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात व्यक्तिंपेक्षा संस्थात्मक जबाबदारी जास्त आहे. सरकार ही अनेक संस्था-यंत्रणा संचालित करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे सरकारची जबाबदारी सर्वांत मोठी. सरकारने ही कारवाई पुढे नेताना हे लक्षात घेतले पाहिजे की, शिक्षण क्षेत्रातील चूक किंवा भ्रष्टाचार इतर क्षेत्रांपेक्षा अधिक गंभीर असतो. निकृष्ट रस्ता काही वर्षांनी पुन्हा बांधता येतो. चुकीचा आर्थिक निर्णय दुरुस्त करता येतो. परंतु अयोग्य शिक्षकामुळे झालेली बौद्धिक हानी अनेक पिढ्यांपर्यंत भरून निघत नाही. शिक्षक भरती ही केवळ रोजगाराची प्रक्रिया म्हणून पाहण्याची चूक आपण वारंवार करतो. प्रत्यक्षात ती राष्ट्राच्या मानवी भांडवलातील सर्वांत महत्त्वाची गुंतवणूक असते. ही गुंतवणूक सार्थकी लावायची असेल तर टीईटीवरील विश्वास पुनर्स्थापित करावा लागेल. त्यासाठी सरकारला दोषींवर कठोर कारवाई करावी लागेल आणि प्रामाणिक व कष्टाळू उमेदवारांना चांगली संधी मिळेल, याची काळती घ्यावी लागेल. प्रत्येक उमेदवाराला हे निश्चित वाटले पाहिजे की त्याच्या उत्तरपत्रिकेचे मूल्य त्याच्या गुणवत्तेने ठरणार आहे, कोणाच्या संपर्काने किंवा व्यवहारामुळे नाही. टीईटी पेपरफूट घोटाळ्याचे कवीत्व हेच सांगते आहे. सरकारच्या म्होरक्यांना त्याचे महत्त्व कळेल तो शिक्षणाच्या दृष्टीने सुदिन.