...आणि व्हेनेझुएला म्हणाला ‘थँक यू इंडिया’

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
काराकास,
Venezuela said Thank you India विनाशकारी भूकंपानंतर गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या व्हेनेझुएलामध्ये भारताने सुरू केलेल्या मदतकार्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘ऑपरेशन अमिस्ताद’ अंतर्गत भारताकडून पुरवण्यात येत असलेल्या मानवतावादी मदतीबद्दल व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली असून, अनेकांनी “धन्यवाद, भारत” असे म्हणत भारतीय मदतकार्याचे कौतुक केले आहे. व्हेनेझुएलामध्ये भारतीय लष्कराचे मदतकार्य सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. भारतीय लष्कराने उभारलेल्या फील्ड हॉस्पिटलमध्ये जखमी आणि बाधित नागरिकांवर उपचार सुरू असून, आरोग्यसेवेचा मोठा आधार स्थानिकांना मिळत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये स्थानिक कुटुंबे भारताने दिलेल्या मदतीबद्दल आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवांबद्दल आभार व्यक्त करताना दिसत आहेत.
 
 

व्हेनेझुएला 
एका व्हिडिओमध्ये उपचार घेतल्यानंतर एका महिलेने भारतीय वैद्यकीय तज्ज्ञांचे विशेष कौतुक केले. फील्ड हॉस्पिटलमध्ये मिळालेली सेवा अत्यंत दर्जेदार आणि संवेदनशील असल्याचे तिने सांगितले. दुसऱ्या एका व्हेनेझुएलन महिलेने भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, भारतीयांनी उभारलेले हे फील्ड हॉस्पिटल स्थानिकांसाठी मोठा आधार ठरत आहे. तसेच एका ६० वर्षीय नागरिकाने आपल्या संपूर्ण आयुष्यात इतकी प्रभावी आणि समर्पित वैद्यकीय सेवा कधीच पाहिली नसल्याचे सांगत भारतीय लष्कराचे आभार मानले.भारतातील व्हेनेझुएलाच्या दूतावासानेही कॅराकसमधील भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी झालेल्या भूकंपानंतर प्रभावित नागरिकांच्या मदतीसाठी कॅराकसच्या ला रिनकोनाडा येथे भारतीय सशस्त्र दलाच्या तुकडीने फील्ड हॉस्पिटल उभारले आहे. या मोहिमेसाठी विशेष प्रशिक्षित कर्मचारी तैनात करण्यात आले असून, हा उपक्रम भारत-व्हेनेझुएला द्विपक्षीय सहकार्याचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे.
भूकंपानंतर भारताने ‘ऑपरेशन अमिस्ताद’ अंतर्गत मदत साहित्य, औषधे, वैद्यकीय पथके आणि बचाव कर्मचारी पाठवून मदतीचा हात पुढे केला आहे. व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र मंत्रालयानेही भारताच्या या मानवतावादी मदतीचे स्वागत केले आहे. दरम्यान, सीएनएनच्या वृत्तानुसार, नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा १,७१९ वर पोहोचला आहे. या भूकंपाचा फटका आतापर्यंत २२,६१९ लोकांना बसला असून ५,०३४ जण जखमी झाले आहेत. एकूण ८५५ इमारतींचे नुकसान झाले असून त्यापैकी १८९ इमारती पूर्णपणे कोसळल्या आहेत. २४ जूनपासून आतापर्यंत ६०९ भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अंदाजानुसार मृतांचा आकडा १०,००० पेक्षा अधिक जाण्याची ४४ टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.