बाई गेल्या… छातीत धस्स झाली

विजया मेहता यांच्या निधनानंतर सुकन्या मोने यांची भावूक आठवण

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
मुंबई
sukanya mone मराठी रंगभूमीला नवे आयाम देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं मंगळवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी केवळ अनेक दर्जेदार नाट्यकृती प्रेक्षकांना दिल्या नाहीत, तर असंख्य कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक घडवण्यातही मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीच्या सोनेरी इतिहासातील एक महत्त्वाचं पर्व संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी वाळकेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत असून अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही सोशल मीडियावर अत्यंत भावूक शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 

veteran theatre legend vijaya mehta passes away at 92 sukanya mone shares emotional tribute 
विजया मेहता यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत सुकन्या मोने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “बाई गेल्या.. असा विजय केंकरेंचा फोन आला आणि छातीत धस्स झालं. त्यांची तब्येत वयोमानाप्रमाणे बरी नव्हती हे कळलं होतं. पण भेटायला जायची हिंमत होत नव्हती. बातमी आली.. ‘लाइफलाइन’, ‘नागमंडल’चे सगळे दिवस डोळ्यासमोर गेले आणि बाईचा आवाज कानात घुमायला लागला. ते त्यांचं डोळे मिचकावून हसणं, गोड स्वरात अगदी एखाद्या लहानग्या बाळाला समजवावं असं बोलणं, सगळं सगळं आठवायला लागलं.”पुढे त्यांनी विजया मेहता यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणींना उजाळा देताना लिहिलं, “नागमंडलच्या वेळी माझे केलेले लाड… ‘लाइफलाइन’मध्ये खरंतर एकाच भागात माझं काम होतं. परंतु माझं काम आणि माझी त्याला योग्य असलेली प्रकृती बघून माझी भूमिका शेवटपर्यंत त्यांनी ठेवली. नुसती ठेवली नाही तर प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशी भूमिका मला दिली. माझं महाविद्यालयाचं शेवटचं वर्ष होतं म्हणून मला आणि रेणुकाला (ती एमए करत होती) नानावटी हॉस्पिटलमध्ये जिथे आमचं शूटिंग चालू होतं, तिथे अभ्यासासाठी एक वेगळी रूमही दिली होती.”
सुकन्या यांनी पुढे सांगितलं की, “‘नागमंडल’च्या वेळी माझं दुसरं नाटकही सुरू होतं. मात्र त्या भूमिकेसाठी त्यांना मीच हवी होते आणि अगदी 15 ते 20 दिवस आधी मी त्या नाटकात सहभागी झाले. तालमी एनसीपीएमध्ये व्हायच्या. त्यामुळे ज्या ठिकाणी माझा प्रयोग असेल, तिथे जाण्या-येण्यासाठी त्या मला त्यांची गाडी द्यायच्या. मी खूप चहा प्यायचे, त्यामुळे माझ्यासाठी भरपूर चहा पिंपात ठेवलेला असायचा.”विजया sukanya mone मेहता यांच्या दिग्दर्शनशैलीविषयी बोलताना त्यांनी लिहिलं, “बाईंच्या कामाची पद्धतच फार वेगळी होती. त्यामुळे ती प्रक्रिया तुम्हाला खूप अभ्यास करायला लावायची आणि समृद्ध करायची. एखादा सीन द्यायच्या आणि आम्हालाच इम्प्रोव्हाइज करायला सांगायच्या. त्यानंतर लेखकाने लिहिलेले संवाद सांगायच्या. त्यामुळे संवाद आपोआप लक्षात राहायचे. माझ्या नृत्याचा, माझ्या केसांचा मला पुरेपूर उपयोग करता आला. बाई अशी काही उदाहरणं द्यायच्या की आपोआप आपले हावभाव तसे यायचे. ‘लाइफलाइन’मध्ये माझ्या एका मुलीवर एका नेत्याच्या मुलाकडून अत्याचार झालेला असतो. त्या प्रसंगासाठी बाईंनी एवढंच सांगितलं की, ‘बकरीला बळी द्यायला नेतात, तेव्हा तिला होणाऱ्या वेदना आठव.’ इतकं सोपं करून त्या अभिनय समजावून सांगायच्या.”
 
 
सुकन्या मोने यांच्या या भावनिक पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत विजया मेहता यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला. “प्रारंभी अभिनयातून आपली छाप उमटवल्यानंतर पुढे त्यांनी अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलं. एकाहून एक सरस नाट्यकलावंत त्यांनी घडवले. चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत फडणवीस यांनी विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली.