नवी दिल्ली,
WhatsApp username feature व्हॉट्सॲपने वापरकर्त्यांची गोपनीयता अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने “युझरनेम” हे नवीन फीचर विकसित करण्यास सुरुवात केली असून याच फीचरवर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. मोबाईल नंबर न देता फक्त युझरनेमच्या आधारे संवाद साधता यावा, असा या फीचरचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बदलामुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या फीचरची गंभीर दखल घेतली असून संपूर्ण प्रक्रियेचा सखोल अभ्यास करण्याची तयारी सुरू केली आहे. आवश्यक वाटल्यास मेटा कंपनीला अधिकृत नोटीस पाठवली जाऊ शकते, अशीही माहिती समोर आली आहे. सरकारला या नव्या प्रणालीमुळे सायबर गुन्हेगारांना अधिक संधी मिळू शकते, अशी शंका आहे. त्यामुळे या फीचरच्या सुरक्षा आणि गोपनीयतेच्या सर्व पैलूंची तपासणी केली जाणार आहे.दरम्यान, व्हॉट्सॲपने २९ जून रोजी या युझरनेम फीचरची घोषणा केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वापरकर्त्यांना आता आपला मोबाईल नंबर शेअर न करता एक अद्वितीय युझरनेम तयार करून संवाद साधता येणार आहे. हे फीचर टप्प्याटप्प्याने रोलआउट केले जात असून वर्षाअखेरीस ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कंपनीचा दावा आहे की या नव्या बदलामुळे वापरकर्त्यांना अधिक सुरक्षितता मिळेल आणि गोपनीयतेचा एक अतिरिक्त स्तर तयार होईल. कोणालाही मेसेज पाठवण्यासाठी समोरच्या व्यक्तीचे युझरनेम माहित असणे आवश्यक असेल. यामुळे अनोळखी लोकांकडून होणारा थेट संपर्क काही प्रमाणात नियंत्रित होऊ शकतो, असा कंपनीचा विश्वास आहे. व्हॉट्सॲपच्या ब्लॉगनुसार, प्रत्येक वापरकर्त्याला एक वेगळे आणि युनिक युझरनेम निवडावे लागणार आहे. इच्छेनुसार युझरनेम जनरेटरची मदतही घेता येईल. हे फीचर प्रामुख्याने क्रिएटर्स आणि व्यवसायिक खात्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. सेटिंग्जमधील अकाउंट विभागात जाऊन युझरनेम तयार करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.