व्यसनाधीन-गैरवर्तन करणारे कर्मचारी पोलिस आयुक्तांच्या ‘रडार’वर

- पोलिस आयुक्तांची अंतर्गत व्यवस्था सुधारण्याची तयारी सुरु - कर्मचाऱ्यांची यादी झाली तयार

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
vishwas-nangare-patil : शिस्तप्रीय खाते म्हणून नावलौकिक असलेल्या पोलिस विभागाची प्रतिमा कायम उजळत राहावी यासाठी शहर पोलिस दलातील अंतर्गत व्यवस्था सुधारण्याची प्रक्रिया नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी सुरु केली आहे. पोलिस विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी एक सकारात्मक पाऊल म्हणून पोलिस खात्यातील मद्यपी, व्यसनाधीन, गैरवर्तवणूक आणि सतत गैरहजर राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस आयुक्तांनी यादी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकांच्या माध्यमातून यादी करण्यात आली आहे.
 
 

PATIL 
 
 
 
नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्विकारताच सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे. तसेच शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था नीट समजून घेतली आहे. शहरात महिला व ज्येष्ठ नागरिक सुरक्षेला प्राथमिकता देण्यापासून ते कौटुंबिक तक्रारींचे समाधान होईपर्यंत नागिरकांना सेवेचे व्रत घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. शहर पोलिस दलाची प्रतिमा नागरिकांच्या नजरेत मलिन होऊ नये तसेच समाजात खाकीचा आदर वाढावा म्हणून पोलिस आयुक्तांनी अंतर्गत बदल करणे सुरु केले आहे. सुरुवातीला सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांनी निटनेटक्या वर्दीपासून ते नागरिकांशी सौजन्याने वागण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या आहेत. आता त्यांनी पोलिस खात्याअंतर्गत सुधारणा करण्यासाठी ‘त्रिसूत्री’ कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात सतत शिस्तभंग करणारे पोलिस कर्मचारी रडारवर आले आहेत. सतत गैरहजर राहणारे आणि आजारी असल्याचे सांगणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. तसेच दारुचे व्यसन किंवा अन्य व्यसनाधीन असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची यादी आणि वारंवार गैरवर्तवणूक करणाऱ्यां पोलिस कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी दिले आहे.
ठाणेदाराच्या टेबलावर राहणार यादी
 
गैरवर्तवणूक करणारे, व्यसनाधीन आणि गैरहजर राहणाऱ्यांची यादी तयार करुन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी आपल्या टेबलच्या काचाखाली ठेवण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी केल्या आहेत. त्या पोलिस कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवून सुधारात्मक पवित्रा घेण्यात येणार आहे. व्यसनाधीन कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्त करण्याचा पोलिस विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.
 
आम्हाला लोकाभिमुख पोलिसींग करायची आहे. पोलिस विभागाची उजळलेली प्रतिमा कायम ठेवायची आहे. पोलिस हे शिस्तप्रीय खाते असल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांकडून वर्दीची गरिमा कायम राहावी, यासाठी शिस्तभंग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना तंबी द्यायची आहे. सुधारणात्मक धोरण अवलंबवून कर्तव्य पार पाडायचे आहे.
 
- विश्वास नांगरे पाटील (पोलिस आयुक्त)