तुटलेल्या तारा, रोहित्र व विजेच्या खांबांपासून सावध राहा
यवतमाळ,
Appeal by Mahavitaran पावसाळ्याला सुरुवात होताच वादळी वारे, विजांचा कडकडाट व मुसळधार पावसामुळे विजेच्या दुर्घटनांचा धोका वाढतो. तुटलेल्या विजेच्या तारा, विजेचे खांब, रोहित्र, फिडर पिलर तसेच शॉर्टसर्किटमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी आणि वादळामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे, रोहित्रातून ठिणग्या पडणे किंवा शॉर्टसर्किट होणे अशा घटना घडू शकतात. अशा वेळी लोंबकळणाèया किंवा तुटलेल्या तारांना स्पर्श करू नये. रोहित्र, फिडर पिलर किंवा विजेच्या खांबाजवळ शॉर्टसर्किट झाल्यास त्या परिसरात जाणे टाळून तातडीने महावितरणला माहिती द्यावी.
पावसाळ्यात घरातील विद्युत उपकरणे, शेती पंपावरील स्विचबोर्ड तसेच उघड्या विद्युत तारा यांच्यामुळेही अपघात होऊ शकतात. नागरिकांनी घर, सोसायटी व परिसरातील विद्युत यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी. पत्र्याच्या घरांमध्ये राहणाèयांनीही आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणने नागरिकांना विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत किंवा दुचाकी टेकवून ठेवू नका, पूरस्थितीत नदीकाठच्या भागात विशेष दक्षता घ्यावी, असेही सांगितले आहे. भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरणे, झाडे कोसळणे किंवा वीज पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशीही सूचना करण्यात आली आहे.
कोणतीही धोकादायक घटना आढळल्यास नागरिकांनी महावितरणच्या जवळच्या कार्यालयास किंवा महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राशी 1912 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा 1800-212-3435 व 1800-233-3435 या टोल-फ्री क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.