पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्काच्या संशयावरून १० युवक ताब्यात

- एटीएसची नागपूरसह सहा जिल्ह्यांत कारवाई - मोबाईल, चॅट व डिजिटल व्यवहारांची चौकशी

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
ats-action : पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शहजाद भट्टी याच्याशी कथित सोशल मीडिया संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) नागपूर युनिटने सहा जिल्ह्यातील १० युवकांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे. नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांत एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
 
 
 
NGP
 
 
 
एटीएसने ताब्यात घेतलेल्या युवकांचे मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाऊंट, चॅट, कॉल रेकॉर्ड तसेच इतर डिजिटल व्यवहारांची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत संबंधित युवकांचा संपर्क केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित होता की त्यांचा एखाद्या संघटित नेटवर्क किंवा संशयास्पद कारवायांशी संबंध आहे, याचा शोध घेतला जात आहे. तपास यंत्रणा परदेशातील सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून युवकांवर प्रभाव टाकण्याचा किंवा संवेदनशील माहिती मिळविण्याचा प्रयत्न झाला होता का?, याचाही तपास करत आहे. या प्रकरणात अद्याप कोणत्याही युवकाविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदविण्यात आल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चौकशीच्या निष्कर्षानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
 
 
शहजाद भट्टीचे नाव भारतविरोधी कारवाया आणि आंतरराष्ट्रीय गँगवॉरच्या चर्चांमध्ये यापूर्वीही समोर आले आहे. तो काही काळ भारतीय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा निकटवर्तीय असल्याचा दावा करत होता. मात्र, नंतर दोघांमध्ये वैर निर्माण झाल्याचे समोर आले असून सोशल मीडियावरून एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या घटनाही चर्चेत आल्या होत्या. डिजिटल माध्यमांचा वापर करून गुन्हेगारी नेटवर्क युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे एटीएस सूत्रांनी सांगितले आहे.
 
 
एटीएसचे नागरिकांना आवाहन
 
 
शहजाद भट्टी किंवा इतर कोणत्याही संशयित परदेशी गुन्हेगाराशी संबंधित पोस्ट, व्हिडिओ किंवा प्रचारात्मक सामग्रीची सत्यता पडताळून न पाहता ती लाईक, शेअर किंवा फॉरवर्ड करू नये. अशा प्रकारच्या ऑनलाइन हालचाली तपासाच्या कक्षेत येऊ शकतात आणि आवश्यकतेनुसार संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते.