राज्यभरात एटीएसचे १५० हून अधिक ठिकाणी छापेमारी

पाकिस्तानातील शहजाद भट्टी प्रकरण तापले

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
मुंबई,
ATS raids across the state पाकिस्तानातील शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) राज्यभर व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत राज्यातील १५० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या असून, मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये तपास सुरू आहे.प्राथमिक माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय असलेल्या १५० हून अधिक व्यक्ती एटीएसच्या रडारवर आहेत. याच अनुषंगाने राज्यभर समन्वयित शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईबाबत अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला, तरी राज्यभर सुरू असलेल्या धाडसत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शहजाद भट्टीशी संबंधित कथित दोन मॉड्यूल उद्ध्वस्त करत दिल्ली आणि पंजाबमधून सहा संशयितांना अटक केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातही तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
 
 
sq
 
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संशयितांनी दिल्लीतील न्यू पोलीस लाइन्स, आनंद विहार आंतरराज्य बस स्थानक, एका रेल्वे स्थानकासह अनेक गजबजलेल्या भागांची पाहणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या ठिकाणांचे व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आले असून, ते एका बंदी घातलेल्या मेसेजिंग अॅपद्वारे शहजाद भट्टीकडे पाठवण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, तपासात मिळालेल्या सोशल मीडिया चॅट्समध्ये शहजाद भट्टी हा दानिश उर्फ चांद मियाँ याला काही साहित्य पोहोचवण्याबाबत आणि साठवण्याबाबत सूचना देत असल्याचे आढळले आहे. तपासकर्त्यांच्या मते, हे साहित्य पेट्रोल बॉम्ब असल्याचा संशय आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी विजय घाट परिसरातून पेट्रोल बॉम्ब जप्त केले होते.
 
 
तपास यंत्रणांच्या मते, अटक करण्यात आलेले सहा संशयित पाकिस्तानातील आणखी दहा व्यक्तींच्या संपर्कात होते. या संपूर्ण नेटवर्कमधील त्यांची भूमिका आणि संभाव्य कटाबाबत चौकशी सुरू आहे. दानिशला दिल्लीतील संभाव्य हल्ल्यांसाठी टेहळणीचे काम देण्यात आले होते आणि त्यासाठी २० हजार रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. त्याचा साथीदार सलमानने कथितपणे पाहणीचे चित्रीकरण करून ते फुटेज शहजाद भट्टीला पाठवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असून, तो दुबईतून विविध गुन्हेगारी नेटवर्कशी संबंधित कारवाया चालवत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांशी संपर्क साधून त्यांना कथितपणे गुन्हेगारी आणि अतिरेकी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय त्याच्यावर आहे. महाराष्ट्रातील काही व्यक्ती त्याच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे संपूर्ण जाळे उध्वस्त करण्यासाठी एटीएसने राज्यव्यापी कारवाई सुरू केली आहे. तपास अद्याप सुरू असून, पुढील चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.