मेस्सी-एमबाप्पेमध्ये गोल्डन बूटसाठी अटीतटीची लढत

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Battle between Messi and Mbappé for the Golden Boot फिफा विश्वचषक २०२६ मधील पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोचा २-० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. या विजयात फ्रान्सचा कर्णधार किलियन एमबाप्पे याने महत्त्वाची भूमिका बजावत स्पर्धेतील आपला आठवा गोल नोंदवला. या गोलामुळे त्याने अर्जेंटिनाचा दिग्गज लिओनेल मेस्सी याच्या गोलसंख्येशी बरोबरी साधली असून, गोल्डन बूटच्या शर्यतीत आता दोघांमध्ये अटीतटीची स्पर्धा रंगली आहे.मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात एमबाप्पेने ६०व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ६६व्या मिनिटाला त्याने केलेल्या अचूक पासवर उस्मान डेंबेलेने दुसरा गोल करत फ्रान्सचा विजय निश्चित केला. सामन्याच्या २६व्या मिनिटाला एमबाप्पेला पेनल्टीवर गोल करण्याची संधी मिळाली होती, मात्र तो प्रयत्न अपयशी ठरला. संपूर्ण सामन्यात त्याने गोलपोस्टवर चार प्रयत्न केले, त्यापैकी दोन अचूक लक्ष्यावर होते.
 
 

messi  
गोल्डन बूटच्या शर्यतीत सध्या किलियन एमबाप्पे आणि लिओनेल मेस्सी प्रत्येकी ८ गोलांसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. नॉर्वेचा एर्लिंग हालंड ७ गोलांसह तिसऱ्या स्थानावर असून, इंग्लंडचा हॅरी केन ६ गोलांसह चौथ्या क्रमांकावर आहे. फ्रान्सचाच उस्मान डेंबेले ५ गोलांसह या यादीत पाचव्या स्थानावर आहे. फ्रान्सने मोरोक्कोचे विश्वचषकातील स्वप्न सलग दुसऱ्यांदा भंग केले आहे. चार वर्षांपूर्वी कतारमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही फ्रान्सने मोरोक्कोचा २-० असा पराभव केला होता. यंदाही उपांत्यपूर्व फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले आणि पुन्हा एकदा फ्रान्सने त्याच फरकाने विजय मिळवत पुढील फेरीत स्थान मिळवले.