नोटांच्या बंडलचे व्हॉट्सॲप स्टेटस पडले महागात;

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
- नोटांच्या व्हिडिओवरून घरफोडी, नंतर खंडणीची मागणी
 
अनिल कांबळे
नागपूर, 
Beltarodi House-breaking Case व्हॉट्सॲप स्टेटसवर नोटांच्या गड्ड्यांचा व्हिडिओ शेअर करणे एका बांधकाम ठेकेदाराला चांगलेच महागात पडले. स्टेटस पाहिल्यानंतर परिचिताने घरात मोठी रोकड असल्याची माहिती गुन्हेगारांना दिली. त्यानंतर घरफोडी करून रोकड व दागिने लंपास करण्यात आले. एवढेच नव्हे तर चोरीनंतर ठेकेदाराला फोन करून खंडणीची मागणी करत कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

gharfodi 
 (संग्रहित छायाचित्र )
 
 
बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मॅक्स ग्लोरी अपार्टमेंट येथे राहणारे बांधकाम ठेकेदार समीर यासलवार (वय ३२) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. २६ जून रोजी त्यांच्या घरातून ५० हजार रुपयांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले होते. घटनेनंतर आरोपींनी समीर यांना फोन करून मोठ्या रकमेची मागणी केली. पैसे न दिल्यास कुटुंबाला ठार मारण्याची धमकीही दिली. तक्रार मिळाल्यानंतर बेलतरोडी पोलिस आणि गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कारचा माग काढण्यात आला. त्यावरून पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचत तपास केला असता, समीर यांचा परिचित श्रेयस बोरकर याने इतर साथीदारांसह घरफोडीचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात पोलिसांनी कुख्यात आरोपी अक्षय लोखंडे आणि संतोष डाबने यांना वाडी येथील एका लॉजमधून अटक केली. त्यांच्या ताब्यातून १३ हजार रुपयांची रोकड, चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार असा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मुख्य आरोपी श्रेयस बोरकर आणि त्याचे इतर साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, समीर यासलवार यांनी आपल्या मुलीचा ५० हजार रुपयांच्या नोटांच्या गड्ड्यांसोबत खेळतानाचा व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला होता. हा व्हिडिओ पाहून आरोपींनी घरात मोठी रोकड असल्याचा अंदाज बांधला आणि घरफोडीचा कट रचला. अटक करण्यात आलेला संतोष डाबने हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत चोरीचे ७५ ते ८० गुन्हे दाखल आहेत.