क्रिप्टो करन्सीचे आमिष दाखवून १९ लाखांची सायबर फसवणूक

-पश्चिम बंगालमधून आरोपी अटकेत - गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई - १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
cyber-fraud : स्वस्त दरात क्रिप्टो करन्सी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून एका किराणा व्यावसायिकाची १९ लाख रुपयांची सायबर फसवणूक केली. या प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पथकाने पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून अटक केली आहे. पोलब पार्थ सरकार (वय २३, रा. आसनसोल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
 
 
JK
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिमकी येथील किराणा व्यापारी रोहित जाघरे यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून लखनौ येथील अर्श सिद्दीकी याच्याशी ओळख झाली होती. अर्शने प्रत्येकी ८० रुपयांच्या दरात यूएसडीटी आणि क्रिप्टो करन्सी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले. त्याच्या सांगण्यावरून रोहित यांनी पोलब पार्थ सरकार यांच्या बँक खात्यात सुमारे १९ लाख रुपये ट्रान्सफर केले.मात्र, पैसे स्वीकारल्यानंतर आरोपींनी ना क्रिप्टो करन्सी दिली, ना रक्कम परत केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रोहित जाघरे यांनी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट-३कडे सोपविण्यात आला.
 
 
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पथक पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे पोहोचले आणि आरोपीला अटक करून नागपुरात आणले. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलिस निरीक्षक अतुल मोहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मधुकर काठोके, संतोष ठाकूर, विजय श्रीवास, मनोज नेवारे तसेच दीपक लकडे, दीपक दासलवार, जितेश रेड्डी, सहदेव चिकले, चंद्रकांत, विशाल आणि प्रमोद यांनी केली.