रोजगारासाठी तेलंगणात गेलेल्या 4 मजुरांचा अपघाती मृत्यू

मृतांमध्ये माय-लेकीचा समावेश; पवना गावावर शोककळा

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
सिंदेवाही,
Death of 4 laborers from Chandrapur रोजगाराच्या शोधात तेलंगणा राज्यात गेलेल्या तालुक्यातील पवना येथील मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात झाला असून, त्यात माय, लेकींसह चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. पवना गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील पवना येथील काही मजूर स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने तेलंगणा राज्यात शेतातील रोवणीच्या कामासाठी गेले होते. सलग तीन दिवस त्यांनी शेतात रोवणीचे काम केले. गुरुवारी सायंकाळी काम आटोपून ते राहत्या ठिकाणी परत जात असताना त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये अतुल अशोक सोनूले (36), अर्चना जनार्धन सोनूले (36), रंजू प्रभाकर शेंडे (45, सर्व रा. पवना, ता. सिंदेवाही) आणि प्रभा सीताराम माहुर्ले (56 वर्षे, रा. वाढोना, ता. नागभीड) यांचा समावेश आहे.
 
 
 
Chandrapur
 
 
अर्चना जनार्धन सोनूले आणि तिची विवाहीत मुलगी प्रभा सीताराम मोहुर्ले या मायलेकींचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. सिंदेवाही तालुक्यात यापूर्वी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातही अनेकांनी जीव गमावला आहे. आता रोजगारासाठी परराज्यात गेलेल्या मजुरांच्या अपघाती मृत्यूने ग्रामीण भागातील रोजगार, सुरक्षित प्रवास आणि मजुरांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाने ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला प्राधान्य देऊन अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या अपघाताबाबत स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.