ढाका,
development regarding the Ganga agreement बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांत अनेक कारणांमुळे तणावपूर्ण राहिले असले, तरी आता गंगा नदीच्या पाणी वाटप कराराच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये पुन्हा संवाद सुरू झाला आहे. १९९६ मध्ये झालेल्या ३० वर्षांच्या गंगा जल कराराची मुदत संपत आली असून, त्याच्या नूतनीकरणासाठी बांगलादेश भारताच्या सकारात्मक भूमिकेची अपेक्षा व्यक्त करत आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्री शमा ओबेद इस्लाम यांनी एका परिषदेत बोलताना भारतासोबत द्विपक्षीय चर्चा सुरू असल्याचे सांगितले. भारत या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गंगा नदीच्या पाण्याचे वाटप हा बांगलादेशसाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

१९९६ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत ३० वर्षांसाठी करार झाला होता. आता या कराराची मुदत संपत असल्याने तो पुढेही कायम राहावा, यासाठी बांगलादेशकडून प्रयत्न सुरू आहेत. या कराराचा देशाच्या जलव्यवस्थापनावर आणि शेतीवर मोठा परिणाम होत असल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.दरम्यान, पाकिस्तान आणि चीनसोबत वाढत्या संबंधांमुळे बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणाबाबत भारतातही चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत गंगा जल कराराबाबत भारत कोणती भूमिका घेतो, याकडे दोन्ही देशांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष लागले आहे. अलीकडच्या काळात गंगा जल कराराबाबत बांगलादेशकडून व्यक्त होणाऱ्या भूमिकेत बदल दिसून येत असल्याची चर्चा आहे. भारतासोबत सकारात्मक मार्गाने तोडगा निघेल, अशी अपेक्षा बांगलादेशकडून व्यक्त करण्यात येत असून, आता या महत्त्वाच्या कराराबाबत भारताचा अंतिम निर्णय काय असेल, याची प्रतीक्षा दोन्ही देशांना आहे.