गडचिरोली,
mla dr devrao holis गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 353 सी व 130 डी च्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, यासंदर्भात माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात माजी आमदार डॉ. होळी यांनी राष्ट्रीय महामार्ग353 सी व 130 डी चे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे महामार्ग पूर्ण होण्यास मोठा विलंब होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद केले.
निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच संबंधित कंत्राटदाराचा परवाना तात्काळ रद्द करून त्याला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावे तसेच उर्वरित कामासाठी नव्याने पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून गुणवत्तापूर्ण व वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही माजी आमदार डॉ. होळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.mla dr devrao holis मुख्यमंत्री देवेंद्रज फडणवीस यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाकडून वस्तुस्थितीचा अहवाल मागवून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याचे डॉ. होळी यांनी सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, नीरज पटेल तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.