स्पा आड सुरू असलेल्या देहव्यापारावर गुन्हे शाखेचा छापा

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
दोन तरुणींची सुटका; संचालकाविरुद्ध गुन्हा

नागपूर, 
Gopalnagar locality case शहरातील गोपालनगर परिसरातील मॅजिक कृष स्पा अँड सलून येथे स्पाच्या आड देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या (एसएसबी) पथकाने छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत देहव्यापार करणाऱ्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून स्पा संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
Crime-Branch
गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसबीच्या पथकाचे प्रमुख दर्शन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. राणा प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्लॉट क्रमांक ११, तिसरा बस स्टॉप येथील स्पामध्ये मसाज सेंटरच्या आड देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी एसएसबीने प्रथम बनावट ग्राहक पाठविला. माहितीची खात्री झाल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी सुमारे ३.३५ वाजता स्पावर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान अधिक कमाईचे आमिष दाखवून तरुणींना देहव्यापार करण्यास भाग पाडले जात असल्याचे तसेच स्पा सेवेच्या नावाखाली ग्राहकांना त्यांची उपलब्धता करून दिली जात असल्याचे उघड झाले. या प्रकरणी स्पा संचालक सोमेश राजेश मंडले (वय ३०, रा. हिल टॉप, पांढराबोडी) याच्याविरुद्ध राणा प्रतापनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३(२), १४३(३) तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान मुक्त करण्यात आलेल्या दोन्ही तरुणींची सुटका करण्यात आली असून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई एसएसबीचे पोलिस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवालदार राम निरगुडवार, शेषराव राऊत, अश्विन मांगे, कुणाल मसराम, समीर शेख आणि पूनम शेंडे यांनी पार पाडली.