मानोरा,
pothole free roads तालुक्यातील विठोली, कारखेडा ते वरोली हा ग्रामीण रस्ता अक्षरशः चाळण झाला आहे. संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने विठोल व वरोली गावातील तसेच या मार्गाने मानोरा ये-जा करणार्या नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या भागाचे जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करणार्या महिला सदस्य पाच वर्षे सभापती होत्या तरीसुद्धा विठोली,कारखेडा, वरोली गलमगाव, चिखली, धानोरा, सोयजना या गावातील रस्ते पाच वर्षांपासून खड्ड्यांनी भरलेले आहे त्यामध्ये सतरामही सुधारणा झालेली नाही.
कारखेडा व वरोली ही गावे जिल्हा परिषदेच्या तळप सर्कलमध्ये येतात. या सर्कलचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवाराकडे होते. तसेच सोबतच देऊरवाडी व इतर गावेही याच सर्कलमध्ये येतात. मात्र, सभापती पद भूषविणार्या त्या वेळच्या महिला लोकप्रतिनिधींनी कारखेडा-वरोली रस्ता निर्मितीसाठी जिल्हा परिषद तसेच संबंधित विभागाकडे किती पाठपुरावा केला व जनतेची ही समस्या निकाली निघावी यासाठी काय प्रयत्न केले, हे कारखेडा व वरोली गावातील नागरिकांसाठी कोडेच असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद सदस्यांसोबतच तळप व देऊरवाडी पंचायत समितीचे गण सदस्यही या गावांशी संबंधित आहेत. मात्र, पं.स.च्या सदस्यांनीही त्यांच्या कार्यकाळात पं.स. असो वा जिल्हा परिषद असो, शासनाकडे लेखी पाठपुरावा करून चाळण झालेल्या या रस्त्याची डागडुजी व्हावी यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले नसल्याच्या संतप्त भावना उपरोक्त गावातील नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या आहेत.pothole free roads या रस्त्याची डागडुजी व्हावी यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच प्रशासक असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः पाठपुरावा करून रस्त्यावरील खड्ड्यांची ही डोकेदुखी मिटवावी, अशी मागणी पुढे येत आहे.
कारखेडा रस्त्याची दयनीय अवस्था. संपूर्ण रस्त्यावर पाणी साचले असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. चिखल व पाण्यामुळे दुचाकी, चारचाकी तर सोडाच, पायी चालणेही मुश्किल झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे व झाडे दिसत असून हा मुख्य रस्ता असल्याचे स्पष्ट होते.