अटक, मृत्यू... काहीही झालं तरी परतेन- शेख हसीना

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
i-will-return-sheikh-hasina बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देशात परतण्याबाबत मोठे वक्तव्य करत, अटक झाली किंवा जीवाला धोका निर्माण झाला तरी मायदेशात परतण्याचा आपला निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या आणि आवामी लीगचे इतर निर्वासित नेते डिसेंबरच्या सुमारास बांगलादेशात परतण्याचा विचार करत असल्याची माहिती त्यांनी एका मुलाखतीत दिली.ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थी आंदोलनानंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना भारतात आल्या होत्या. आता बांगलादेशात परतल्यानंतर न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, या परतीबाबत सध्याच्या बांगलादेश सरकारशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 

shekhhasina 
"माझ्या परतीनंतर मला अटक होऊ शकते, माझा जीवही जाऊ शकतो. तरीही मला माझ्या देशात परतायचे आहे," असे हसीना यांनी मुलाखतीत म्हटले. आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सध्या मोठ्या दडपणाखाली असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या संघर्षात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. "मृत्यू आला तरी तो माझ्या मातृभूमीत यावा, जिथे माझ्या आई-वडिलांचे समाधिस्थळ आहे," असेही त्या म्हणाल्या.दरम्यान, २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराशी संबंधित मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. आंदोलनादरम्यान आंदोलकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा किंवा ते रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका न्यायाधिकरणाने ठेवला आहे. याच प्रकरणात माजी गृहमंत्री असदुझमान खान कमाल यांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून, माजी पोलीस महासंचालक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच शेख हसीना आणि कमाल यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायाधिकरणाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.