अभिजित वर्तक
aparna hartalkar shembekar माझ्या सुदैवाने मला नागपुरातील प्रतिष्ठित महाविद्यालयात इंग्रजी साहित्य, संस्कृत आणि मानसशास्त्र या माझ्या अत्यंत आवडत्या विषयांचं शिक्षण घेता आलं. ते महाविद्यालय म्हणजे गांधीनगर येथे आजही हजारो विद्यार्थिनींना आभाळझेप घेण्याचं सामर्थ्य देणारं एल.ए.डी. महाविद्यालय!
त्यावेळी आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या होत्या डॉक्टर पन्ना आखानी. त्यांचं ते राजस, बहुआयामी आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व त्यांच्याबद्दल आदरयुक्त धाक वाटायला लावणारं होतं. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन्ही दिवशी सगळ्या विद्यार्थिनींनी हे दोन्ही राष्ट्रीय सण महाविद्यालयात जल्लोषात आणि शिस्तीत साजरा केले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असायचा.
मला इंग्रजी साहित्य शिकवणार्या टिकू मॅडम, पाठक मॅडम, चौटाई मॅडम त्यांच्या अप्रतिम अध्यापनकौशल्यामुळे माझ्यात साहित्य, भाषा यांची आवड खोलवर रुजली ती कायमचीच! संस्कृत भाषा शिकवणार्या गाडगे मॅडम, होटे मॅडम यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचे ऐश्वर्य, संस्कृत भाषेचे माधुर्य मनात ठसवले. मानसशास्त्र शिकवताना सप्रे मॅडम, एलकुंचवार मॅडम यांनी मानवी वर्तणुकीचे तलम पदर शास्त्रोक्त पद्धतीने अलगद उलगडून दाखवले. यासोबतच या कॉलेजमध्ये खूप मैत्रिणी मिळाल्या. आजही आम्ही सगळ्या एकमेकींच्या छान संपर्कात आहोत. मैत्रिणींची आठवण येताच डोळ्यांसमोर कॉलेजच्या कोपर्यात असलेलं आमचं आवडतं ठिकाण ‘कॅन्टीन’ आठवतं. सकाळी सकाळी दोन लेक्चर्स झाल्यानंतर गरम गरम समोशांचा सुगंध दरवळत यायचा आणि आम्हा मैत्रिणींची पावलं गप्पा करता करता आपोआप कॅन्टीनच्या दिशेने वळायची!
आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथालय हे माझे आवडते ठिकाण होते. वेगवेगळ्या साहित्यप्रकारांमधली शेकडो पुस्तके तिथे मोठ्या मोठ्या कपाटांमध्ये क्रमवार रचून ठेवलेली असायची. कपाटाच्या काचेतून मोठ्या मोठ्या लेखकांची नावं वाचताना फार भारी वाटायचं. कधी कधी एखादा तास बुडवून आवडत्या पुस्तकाचा फडशा पाडताना या ग्रंथालयाने मला बघितले आहे (पण कधीही त्याने कोणाला सांगितले नाही) !
या कॉलेजमध्ये असताना आम्ही दोन ट्रेकिंग कॅम्प केले. पहिला पचमढी येथे आणि दुसरा तपोवन ते गंगोत्री. यावेळी आम्हाला विद्यापीठाने प्रवासखर्चामध्ये काही सवलत दिली होती. ती सवलत मिळवण्यासाठी आवश्यक कागदोपत्री कामकाज स्वतः पूर्ण करताना मला स्वतःची बाजू अधिकार्यांसमोर मांडणे, योग्य वेळेत वेगवेगळे अर्ज अचूक भरणे, ते योग्य कार्यालयात वेळेत सादर करणे अशा सरकारी कामांचा अनुभव घेता आला. महाविद्यालयातील वेगवेगळ्या स्पर्धा, स्नेहसंमेलन, कार्यशाळा यातून खूप काही शिकायला मिळाले. ती शिदोरी आजही कामी येते. त्यावेळी एल.ए.डीत शिकणार्या विद्यार्थिनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. काही अतिशय साध्या आणि फक्त शिकण्यासाठी आलेल्या. काही विद्यार्थिनी फक्त मुलींचे कॉलेज असल्यामुळे वेगवेगळे छान छान कपडे आणि सौंदर्यप्रसाधने वापरून मस्त आनंदात वावरणार्या आणि काही अभ्यास आणि वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेऊन आनंद मिळवणार्या. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींमध्ये सहज मिसळण्याचा सराव झाला.
कधी कधी अचानक एखादी एल.ए.डी.ची माजी विद्यार्थिनी कुठल्यातरी समारंभात, कार्यक्रमात भेटते. आपण एकाच महाविद्यालयातून शिकलेलो आहोत याचा होणारा आनंद आणि अभिमान दोघींच्याही डोळ्यांत एकमेकींना सारखाच उमटलेला दिसतो! आजही त्या रस्त्याने जाताना एल.ए.डी.महाविद्यालयाचे भव्य प्रवेशद्वार दिसते आणि नकळत मन त्या काळात शिरतेः. पुन्हा एकदा ते सुंदर दिवस अनुभवण्यासाठी!
अपर्णा हरताळकर शेंबेकर
शेंबेकर